scorecardresearch

अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता

पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती; यावर्षीपासूनच महाविद्यालय सुरु होणार

अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता

अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाली आहे. यावर्षीपासूनच अलिबाग येथे हे महाविद्यालय सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, पोलीस अधिक्षक अशोक दुधे, जिल्हा शल्यचिकीत्सक सुहास माने आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने ३१ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयानुसार अलिबाग येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या आधिन राहून मंजुरी दिली होती. मात्र नंतर जागे आभावी हा प्रस्ताव लालफीतीत अडकला होता. २०२० पर्यंत याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती. तब्बल नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. यावर्षीपासूनच १०० विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय सुरु होणार आहे.

महाविद्यालयासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय पुढील तीन वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने सलग्न करण्यात आले आहे. आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील माध्यमिक शाळेची जुनी इमारत इतर सहा इमारती असा सहा एकरचा परिसर महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात लेक्चर हॉल आणि ग्रंथालय उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. उसर येथील ५३ एकरचा भुखंड महाविद्यालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर ४०६ कोटींच्या खर्चून नवीन इमारत बांधली जाणार आहे. त्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी चार वर्षात १ हजार ०७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे यावेळी तटकरे यांनी सांगीतले.

गेल्या आठ महिन्यात राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व बाबांची पुर्तता केली होती. यानंतर भारतीय आयुर्विज्ञान परीषदेकडे मान्यतेसाठी अर्ज करण्यात आला होता. गेल्या महिन्यात आयुर्विज्ञान परिषदेच्या पथकाने अलिबाग येथे येऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या तयारीचा आढावा घेतला होता. यानंतर ही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे रायगडकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पुर्ण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. या महाविद्यालयामुळे रायगडच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल. कोकणातील विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेदरम्यान अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निवड करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 17:09 IST

संबंधित बातम्या