सांगली : केंद्र शासनाने इंधनावरील करामध्ये कपात करताच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने व्हॅटमध्ये कपात करून दिलासा देण्यात आल्याचे सांगितले. मात्र ही सामान्य जनतेची शुध्द फसवणूक होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर तत्काळ करामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी भाजपच्या इस्लामपूर शहर शाखेने केली. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.
केंद्राने करकपात करताच राज्यातही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि डिझेलमध्ये १ रुपया ४४ पैसे कपात केल्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात ही फसवूणकच होती. केंद्राचा कर १९ तर राज्याचा कर ३० रुपये प्रतिलिटर आहे.
सर्व राज्यामध्ये सर्वाधिक करआकारणी महाराष्ट्रात केली जात असून महागाई कमी करण्यासाठी इंधनावरील कर कमी करण्यात यावा असे निवेदन शहर भाजपच्यावतीने देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अशोक खोत, जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गौरव खेतमर, संदीप पवार, अल्ताफ तहसीलदार, विकास परीट आदी उपस्थित होते.