अलिबाग तालुक्यातील आठ खासगी खारबंदिस्ती योजनांचा लवकरच सरकारी योजनांत समावेश केला जाणार आहे. सीआरझेड क्लीअरन्स मिळाल्यानंतर या योजनांचा राज्य सरकारकडून पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील खारबंदिस्तीचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
अलिबाग तालुक्यात खारबंदिस्तीच्या एकूण ३५ योजना आहेत. यातील आठ योजना आजही खासगी स्वरूपाच्या आहे. यात प्रामुख्याने शहापूर, रामराज, वासखार, चरीकोपरी, भिलजी बोरघर, खातविरा, हाशिवरे आणि कालवठ या योजनांचा समावेश असणार आहे. सध्या या योजनांचा खासगी खार योजनांमध्ये समावेश असल्याने या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्य सरकारला खर्च करता येत नव्हता, तर लोकवर्गणीतून हा निधी उभा राहू शकत नव्हता. त्यामुळे योग्य देखभालीअभावी या बंदिस्तीला वारंवार खांडी जाण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे लगतच्या परिसरातील शेतीला धोका निर्माण झाला होता. आता या योजना ताब्यात घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानुसार जिल्ह्य़ाच्या खारलॅण्ड विभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला आहे. सीआरझेड क्लीअरन्स मिळाल्यानंतर सर्व खारबंदिस्ती योजना सरकारच्या ताब्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती खारभूमिअभिलेख खात्याचे क्षेत्रीय अधिकारी एस. जी. शिरसाठ यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत तालुक्यातील शहापूर, कवाडे आणि बहिरीचा पाडा येथील खारबंदिस्तीला खांडी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यापैकी शहापूर येथील खांड दुरुस्त करण्यासाठी टाटा पॉवर कंपनीने १५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
तर कवाडे इथे सहा किलोमीटर खारबंदिस्तीच्या कामाला शासनाची मंजुरी मिळाली असून, यातील पहिल्या टप्प्यातील अडीच किलोमीटरचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र उर्वरित भागात या खांड जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून काम केली जाणार आहेत.
तर बहिरीचा पाडा येथील ग्रामसंरक्षक बंधाऱ्याला खांड गेली आहे. या ठिकाणी १२०० मीटरच्या बंधाऱ्यांचे काम केले जाणार आहे. यातील ३०० मीटरच्या कामाला रोजगार हमी योजनेतून मंजुरी मिळाली आहे. ही कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.