कीर्ती केसरकर

शहरातील बहुतांश गोविंदा पथकांचा विमा काढण्यात आला नसल्याची बाब उघड झाली आहे. विमा नसताना शेकडो गोविंदा हंडी फोडण्यासाठी थर लावणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात अधिकृत आणि नोंदणी करण्यात न आलेली २००हून अधिक गोविंदा पथके आहेत. यातील केवळ ५७ पथकांतील गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे.

दर वर्षी हंडी फोडताना दुर्घटना घडतात. यात काही गोविंदांच्या जिवावरही बेतले जाते. तर काही जण जायबंदी होतात. सराव करताना तसेच दहिहंडीच्या दिवशी गोविंदा पथकांच्या होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच त्यांना वैद्यकीय संरक्षण मिळण्यासाठी गोविंदा पथकातील गोविंदाचा विमा उतरावा लागतो गोविंदांच्या सुरक्षेसाठी महापालिका काही वर्षांपासून प्रत्येक गोविंदाचा विमा उतरवते. दहीहंडीचा सराव सुरू झाल्यापसून गोकुळाष्टमीपर्यंत हा विमा लागू होतो. मात्र, दहीहंडी एक दिवसावर आली असताना शहरातील फक्त ५७ पथकांतील तीन हजार ८०० गोविंदाचा विमा उतरवण्यात आला आहे.

पालिकेकडे २०० हून अधिक अधिकृत गोविंदा पथकांची नोंदणी करण्यात झालेली आहे. त्यातील ५७ पथकांना विमा मंजूर करण्यात आला आहे. हा विषय गोविंदांच्या जिवाशी निगडित आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आणि त्याबाबत जागृती होणे गरजेचे होते. मात्र, विम्याबद्दल उदासीनता आणि प्रक्रियेतील दिरंगाई यामुळे १५० हून अधिक मंडळांमधील गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

पथकांवर नियंत्रण नाही

नोंदणी नसलेली अनेक अनधिकृत गोविंदा पथके शहरात आहेत. या अनधिकृत पथकांमध्ये लहान मुलांकडून साहसी खेळ करवून घेतले जातात.  दहीहंडीअगोदर अनधिकृत पथकांवर प्रतिबंध लावला गेला नाही. पैशांसाठी जमेल तितके मोठमोठे थर लावण्याचा प्रयत्न या पथकांकडून केला जातो. या वेळी कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास गोविंदांच्या जिवाची काळजी घेणे कठीण होते. तर अनधिकृत पथकांमुळे मारामारी, छेड काढण्यासारखे गुन्हे वाढत आहेत. अधिकृत पथकांची नोंदणी पालिकेकडे करण्यात येते. मात्र, अनधिकृत दहीहंडी पथकांची नोंदणी न झाल्याने त्यांना विमा मिळत नाही.

विमा देण्याआधी गोविंदाचे वय, पथक अधिकृत आहे वा नाही, पालिकेकडे त्याची नोंद आहे की नाही, या सर्व बाबींचा तपास करावा लागतो. म्हणून विमा देण्याच्या प्रक्रियेत विलंब होतो. गोविंदांच्या जिवाचा प्रश्न असल्यामुळे चौकशी केल्याशिवाय विमा देता येणार नाही.

– संजय हेरवाडे, पालिका अतिरिक्त आयुक्त