अकोले: अवैध दारू विक्री विरोधात तालुक्यातील गावोगावचे लोकच आता आक्रमक होताना दिसत आहेत. मागील आठवड्यात लिंगदेवमध्ये महिलांनी गावातील तीन अवैध दारूअड्डे उद्ध्वस्त केले. त्याचीच पुनरावृत्ती म्हाळादेवीमध्ये घडली. गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना होताच ग्रामस्थ, ग्रामरक्षक दलाचे सदस्य, महिलांचा मोर्चा अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धडकला व अवैध दारूविक्री त्यांनी उध्वस्त केली. विशेष म्हणजे अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायत सुविधा न देण्याचा तसेच त्यांना शासकीय सुविधा देऊ नये असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. पिंपळगावखांड, वीरगाव फाटा येथेही महिलांनी अवैध दारू विक्रीला पायबंद घातला.यातून प्रशासनाचे पितळ मात्र उघडे पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

म्हाळादेवी ग्रामपंचायतची ग्राम सुरक्षा दल स्थापनेबाबत विशेष ग्रामसभा काल, गुरुवारी सरपंच किरण उघडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत ११ सदस्याच्या ग्रामसुरक्षा दलाची स्थापन करण्यात आली. यानंतर लगेचच दलाने अवैध दारू विक्रेत्यांच्या घरांकडे मोर्चा वळविला. गावातील कारवाडी येथे दारू खोके मिळाले नाहीत. पण अवैध दारू विक्री न करण्याबद्दल त्यांना ताकीद देण्यात आली. यानंतर ग्रामस्थ ठाकरवाडी येथील अड्डयावर पोहचले.

येथे देशी दारूचे दोन खोके आढळले, ग्रामस्थांनी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. वनहद्दीतील अनधिकृत पत्र्याची शेडही ग्रामस्थांनी उध्वस्त केली. एका महिलेच्या घरात गावठी दारूचे रसायन व दारूची दोन पिपे तसेच घरामागील डोंगरावर, गवतात लपलेले दारूचे पाचसहा ड्रम तरुणांनी शोधले. माजी सरपंच प्रदीप हासे यांनी अकोले पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपसरपंच शांताराम संगारे, ग्रामपंचायत सदस्य कविता हासे, राणी मुंढे, सुनीता मेंगाळ, ग्रामसुरक्षा दलाचे अध्यक्ष अनिल मुंढे आदींच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात आली. तालुक्यातील दारूबंदी आंदोलनाचे संयोजक हेरंब कुलकर्णी यांनी म्हाळादेवी ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. म्हाळादेवी ग्रामस्थांनी ग्रामरक्षक दल स्थापन करून लगेच ग्रामसभा संपल्यावर सगळे ग्रामस्थ व ग्रामरक्षक दल दारू विकणाऱ्यांच्या घरी गेले. तिथे असलेली गावठी दारू फेकून दिली व पकडलेली दारू पोलिसांकडे सुपूर्द केली. दारूविक्रता व्यक्तीला वेगळा व्यवसाय सुरू करण्याचे सर्वांनी आवाहन केले. त्याचे प्रबोधन केले. याबद्दल खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हासे तसेच सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामरक्षक दल यांचे अभिनंदन करीत असतानाच अशीच कृती ग्रामरक्षक दलाने करण्याची आवश्यकता असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

दारूवाले ऐकत नसतील आणि प्रशासन कडक भूमिका घेत नसेल तर गावानेच अशाप्रकारे भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपळगाव खांड, वीरगाव फाटा, लिंगदेव या ठिकाणी महिलांनी पुढाकार घेऊन दारू थांबवली. तालुक्यातील सर्व गावात अशा प्रकारे गावाने आक्रमक होऊन दारू बंद करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.