अहिल्यानगर :पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या जनतेत आक्रोश असताना पाक हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त करण्यासाठी जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ करण्यात आले, तेव्हा त्या मोहिमेत भाग घेणाऱ्या, आमच्या वीरमरणाचीच शक्यता होती. अशा ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये फायटर पायलट म्हणून जी देशसेवेची संधी मिळाली, तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वोच्च असल्याची भावना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या माळेवाडी (ता. श्रीरामपूर) येथील फायटर पायलट देवेंद्र औताडे यांनी व्यक्त केली. देवेंद्र औताडे यांना या मोहिमेतील सहभागाबद्दल वायुसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आलेले आहे.

श्रीरामपूरचा भूमिपुत्र देवेंद्र औताडे यांनी मातृभूमीसाठी केलेल्या बहादुरीचा आदर्श तरुणांसमोर निर्माण व्हावा या उद्देशाने शिवप्रहार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार माळेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र औताडे बोलत होते.

देवेंद्र औताडे म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होताना आमच्या जीविताची शक्यता फक्त ७ टक्के होती तर ९३ टक्के शक्यता आम्हाला लढाईत वीरमरण येणार अशी होती. तरीही सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या हिमतीने पाकिस्तानने बळकवलेल्या काश्मीर भागातील ९ दहशतवादी अड्डे उदध्वस्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण भारताच्या जनतेमध्ये एक आक्रोश उसळून आलेला होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा बदला घेण्याची भावना भारतीय जनतेची होती व त्यानुसार सरकारने नियोजन करत सैन्याला तयारीचे आदेश दिले आणि ऑपरेशन सिंदूर सत्यात उतरले.

लष्कर-ए- तोएबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुलसारख्या दहशतवादी संघटनांच्या शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आला. पाकिस्तान वायुदलाचे हवाईतळही उदध्वस्त करून पाकिस्तानी फौजेला इशारा देण्यात आला. यावेळी औताडे यांनी माळेवाडी येथील शालेय आठवणी जागवताना सांगितले की, घरासमोर अंगणात झोपायचो. त्यावेळी रात्री आकाशातून जाणाऱ्या विमानांकडे पाहत मला पायलट व्हायचे, असे मी घरच्यांना सांगायचो आणि तीच गोष्ट माझ्या डोक्यात बसली व मी फायटर पायलट झालो. ऑपरेशन सिंदूरमधील कामगिरी आयुष्यातील सर्वोच्च कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवप्रहारचे प्रमुख सुरज आगे, श्रीरामपूरची तरुणाई गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा धोका आहे. या तरुणाईला योग्य दिशा मिळण्यासाठी गौरव समारंभ करण्यात आला. देवेंद्र औताडे यांच्या शौर्याचा श्रीरामपूरकरांना अभिमान वाटतो. यावेळी शिवप्रहारचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे, शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

आज सर्वपक्षीयांच्या वतीने सत्कार दरम्यान पायलट देवेंद्र औताडे यांचा उद्या, रविवारी सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीयांच्या वतीने लोकमान्य टिळक वाचनालयातील सभागृहात सत्कार आयोजित करण्यात आला आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते होणाऱ्या या समारंभात आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधा नागवडे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदी उपस्थित राहणार आहेत.