आमदार खताळ यांच्यावरील हल्ला, एकास अटक
संगमनेर: संगमनेरला दहशतीखाली ठेवण्यासाठी विरोधकांचा कार्यक्रम करायचा, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. पराभवाचे दुःख त्यांना अजूनही पचवता येत नाही. लोकशाही मान्य नसल्याने ते आता ठोकशाहीवर आले आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच लोकांनी त्यांना घरी बसवले. वेळ आली तर जशाच तसे उत्तर देण्याची आपलीही तयारी आहे, अशा शब्दांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी टीका केली. यावेळी मंत्री विखे यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
दरम्यान, आमदार खताळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (खांडगाव, संगमनेर) या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात आज, शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महायुतीने आज प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मंत्री विखे, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते.
मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना मंत्री विखे म्हणाले, की कीर्तनकारापाठोपाठ आमदारावर हल्ला करण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात केला गेला. याच दहशतीच्या विरोधात आमदार खताळ उभे आहेत. त्यांनी वर्षानुवर्ष तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवले. मात्र, आपण तालुका दुष्काळमुक्त केला. हेच त्यांना पाहवत नसल्याने त्यांचे खरे रूप कालच्या घटनेतून तालुक्याला कळले आहे.
दरम्यान, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील राजस्थान युवक मंडळ आयोजित गणेशोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन आटोपून आमदार खताळ आपल्या वाहनाकडे परतत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन प्रसाद गुंजाळ याने आमदारांवर हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणासोबत आणखी कोणी सहभागी होते काय, यासह नेमक्या कोणत्या कारणासाठी हल्ला झाला याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.
सध्या शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हल्लेखोर हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप महायुतीकडून तर हल्लेखोर त्यांचाच कार्यकर्ता असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.
कोणाचातरी हस्तक
कोणाच्यातरी हस्तकाने आपल्यावर हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्याने आपण खचणार नाही अथवा विचलितही होणार नाही. सध्या उत्सवाचे दिवस सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी उद्रेक न करता शांतता ठेवावी. पोलीस योग्य तपास करून सत्य सर्वांसमोर आणतील.– आमदार अमोल खताळ
पोलिसांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी
आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन जनतेला द्यावे.
– अजय फटांगरे, अध्यक्ष, तालुका काँग्रेस</p>
आमदार तांबे यांच्याकडून निषेध
माझे सहकारी आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. कोणत्याही कारणास्तव लोकप्रतिनिधींसोबत अशी घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकाराची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे.– आमदार सत्यजित तांबे.
भगवा फडकला पाहिजे..!
आपणही मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही, हे मोर्चासाठी जमलेल्या गर्दीवरून दिसते. आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अचानक घडलेली नाही. याचा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. या हल्ल्याचा खरा निषेध करायचा असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही भगवा फडकला पाहिजे.
– राधाकृष्ण विखे, पालकमंत्री