विर्त सारळ येथील बहुचर्चित गुरचरण जमीनव्रिक्री प्रकरणातील जमीन मोजणी अखेर रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे अधिकाऱ्यांनी पंचानामा करून मोजणी रद्द करत असल्याचे जाहीर केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशाशिवाय मोजणी करू नये अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. दरम्यान मोजणी रद्द झाल्याने आजचा सर्वपक्षीय सत्याग्रह यशस्वी झाल्याच शेतकऱ्यांनी सांगितले.
विर्त सारळ येथील १३ एकर गुरचरण जमीन मुंबईतील एका बडय़ा उद्योगपतीला परस्पर विकण्यात आली. ही जागा सरकारी असून या जागेची विक्री करू नये, असे आदेश तहसीलदारांनी दिले असतानाही जागाविक्री करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. मात्र या जमीनविक्रीला स्थानिक ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला आहे. मुंबईलगत असल्याने इथल्या जागेला सोन्याचा भाव आहे. त्यामुळे बडय़ा उद्योजकांचा या जागेवर डोळा आहे. यातूनच काही गावकऱ्यांना हाताशी धरून शासनाची करोडो रुपयांची जमीनविक्री करण्यात आल्याचा आरोप बिपीन पुरो आणि बाबू वार्डे यांनी केला. ही जागा सरकारी असल्याचे १९३० पासूनचे दाखले असूनही जागाविक्री करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मोजणी केली जाऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. याच मागणीसाठी ग्रामस्थांनी आज गुरचरण जागेत गुराढोरांसह सत्याग्रह केला. शेतकऱ्यांच्या या सत्याग्रहाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे यांनी पाठिंबा दिला होता. कॉँग्रेस नेते प्रवीण ठाकूर, शिवसेना संघटक नरेश म्हात्रे, मनसेकडून प्रणय पाटील या वेळी उपस्थित होते. अखेर ग्रामस्थांचा प्रखर विरोध आणि मोजणीचा अर्ज देणारे अर्जदार हजर नसल्याने ही मोजणी रद्द करत असल्याचे त्यांनी जाहीर केले