महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेलिग्राम लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाणपत्रंं लीक झाल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय ही लिंक व्हायरल करण्यांकडे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या घटनेची दखल घेतली असून सर्व विद्यार्थ्यांची माहिती सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आलं आहे.

हेही वाचा – संजय राऊतांनी सरकारबाबत केलेल्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मला…”

नेमकं काय प्रकरण?

आगामी ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘ब’ आणि गट ‘क’ ही संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एका टेलिग्राम चॅनलवरील लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रमाण पत्रांचा डेटा लीक झाला आहे. ‘हा फक्त नमुना डेटा आहे. आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉगीन आयडी, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, ई-मेल आयडी, अशी बरीच माहिती उपलब्ध आहे. शिवाय संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आमच्याकडे उपलब्ध आहे, असा दावा या लिंकद्वारे करण्यात आला आहे.

हेही वाचा – “‘डेथ वॉरंट’ निघालं, १५ दिवसात सरकार कोसळणार”, राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे म्हणाले…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकाराची तातडीने दखल घेतली आहे. तसेच या प्रकारावर स्पष्टीकरणही दिले आहे. “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली असून या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही”, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा आणि आगामी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही”, असंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. याबरोबरच “प्रवेशप्रमाणपत्रे लीक करणाऱ्या चॅनलच्या अ‍ॅडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल”, अशी माहितीही आयोगाकडून देण्यात आली आहे.