महाबळेश्वर शहर व तालुका परिसरात आज दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मागील ३३ तासांत या वर्षातील उच्चांकी १७ इंच पाऊसाची नोंद झाली.

मुसळधार पावसाने महाबळेश्वर शहर व तालुका परिसराल मंगळवार व बुधवारी  या दोन दिवसात झोडपून काढले. मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून ते बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत  ४२५ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद आहे.  महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून वेण्णा नदी व तलाव दुथडी भरून वाहत आहे.  पाणी  महाबळेश्वर पांचगणी या मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतूक मंदावली होती.  या भागातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची परिस्थिती मंगळवार व बुधवारी दिवसभर होती. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर परिसरात १ जून पासून आज अखेरपर्यंत २५९२.७ मिमी (१०२ इंच) पाऊस झाला आहे. अजुन काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वेण्णा लेक परिसरातील संपूर्ण शेती पाण्या खाली गेली आहे. महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर  साचलेल्या पाण्या मधून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. मुख़्य बाजार पेठेतील रस्ते सुद्धा जलमय झाले आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.