देशभरात कमी पाऊस, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाल्यामुळे व बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीचे भाव ३० टक्क्याने वाढल्यामुळे तिखट खायचे असेल तर अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. बेडगी मिरचीचे भाव १८० ते २२० रुपये प्रतिकिलो, तेजाचे भाव ११० ते १४० रुपये प्रतिकिलो तर गुंटूर मिरचीचे भाव ११० ते १४० रुपये प्रतिकिलो झाले असल्याची माहिती लातूर जिल्हा लाल मिरची व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप स्वामी यांनी दिली.
लाल मिरचीस जीवनावश्यक अन्नघटक मानले जाते. दैनंदिन आहारात, शाकाहारी असो की मांसाहारी, लाल मिरचीचा वापर अपरिहार्य असतो. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे, नेत्रविकारासाठी, शरीरातील कर्ब कमी करण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. जगभर लाल मिरचीचे उत्पादन होते व त्याचे असंख्य प्रकार आहेत. प्रत्येक देशाच्या मिरचीस वेगळीच चव व स्वाद असतो. जगात सर्वाधिक मिरचीचे उत्पादन भारतात होते. मिरची निर्यातीतील प्रमुख देश म्हणून भारत ओळखला जातो. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या प्रांतात मोठय़ा प्रमाणात मिरचीची लागवड होते. आंध्र प्रदेशातील नसíगक परिस्थितीमुळे मिरचीचे उत्पादन अधिक होते. गुंटूर परिसरात उत्पादित होणाऱ्या मिरचीला गुंटूर मिरची तर खम्मम परिसरात उत्पादित होणाऱ्या मिरचीस तेजा मिरची म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांतातील ब्याडगी परिसरात उत्पादित होणाऱ्या मिरचीस बेडकी मिरची म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातील लाल मिरची तिखट असते, पण रंग फिकट असतो. दीर्घ काळ ही मिरची टिकत नसल्यामुळे या मिरचीस मागणी कमी असते. काळा मसाला बनवण्यासाठी मिरची पावडर उत्पादक याचा वापर करतात, तर या परिसरातील शेतकरी लाल मिरची न करता हिरवी मिरचीच दररोज विकून नगदी पसा मिळवतात. देशभरात जानेवारी ते मे महिन्यापर्यंत घरगुती मिरचीची वार्षकि खरेदी केली जाते. याच काळातील लग्नसराईमुळेही मिरचीच्या मागणीत मोठी वाढ होते.
देशभर ७० टक्के लोक स्वत: बाजारपेठेत जाऊन मिरची खरेदी करून कांडून वापरणेच पसंत करतात. घरगुती मागणी प्रकारात बेडगी, गुंटूर व तेजा या जातीच्या मिरचीला मोठी मागणी आहे. जगभर झणझणीत व जास्त तिखट खाणारे लोक खम्ममची तेजा मिरची वापरतात तर रंगास गडद, चवदार, दीर्घकाळ रंग टिकणारी, कमी तिखट अशी बेडगी मिरची खाणारे उच्चशिक्षित लोक असतात. आंध्र प्रदेशात जानेवारी महिन्यापासूनच गुंटूर, वरंगल, खम्मम, हैदराबाद या बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक असते. या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे मिरचीची लागवड कमी झाली. गारपीट व अवकाळी पावसामुळे मिरचीच्या उत्पादनात घट व गुणवत्तेतही घट झाली. या वर्षी बाजारपेठेत मागणीच्या प्रमाणात आवक कमी असल्यामुळे मिरचीचे भाव भडकले आहेत.
महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे या वर्षी मिरचीची लागवड १० टक्क्यांच्या आत आहे. महाराष्ट्राला संपूर्णपणे आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील मिरचीवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा मिरचीच्या भावात या वर्षी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलातूरLatur
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High rate of red chillies
First published on: 04-04-2015 at 01:30 IST