एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची, जगातील पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा (लखनौ, उत्तर प्रदेश) हिच्या यशावर हॉलिवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचे बजेट सुमारे ३०० कोटी रुपयांचे आहे. या चित्रपट कथेच्या मानधनातून मिळणारा पैसा अरुणिमा लखनौजवळ, लहान मुलांची क्रीडा अकादमी उभारण्यासाठी वापरणार आहे.
येथील स्नेहालय संस्थेच्या वतीने युवा प्रेरणा शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात अरुणिमा सहभागी झाली होती. शुक्रवारी तिने राज्यातील सुमारे १५० हून अधिक तरुणांशी संवाद साधला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अरुणिमाने ही माहिती दिली.
रेल्वेमध्ये साखळी चोरांविरुद्ध लढताना अरुणिमाला, चोरटय़ांनी धावत्या रेल्वेतून खाली फेकून दिले, सात तास ती रेल्वे रुळावर पडून होती, या अपघातात तिचा एक पाय कापला गेला तर दुसरा अधू झाला. त्यामुळे एका पायात रॉड घालून व दुसरा कृत्रिम पाय बसवून तिने आपले जीवन सुरु केले. दि. २१ मे २०१३ मध्ये तिने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. पत्रकारांशी संवाद साधताना तिने एव्हरेस्टचे आव्हान कसे पेलले, याचे अनुभव कथन केले. चार महिने रुग्णालयात उपचारासाठी पडून असताना समाज, विविध व्यक्तींकडून झालेल्या टीकेमुळे आपल्यात एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द निर्माण झाली, असे तिने स्पष्ट केले.
अरुणिमा पुर्वाश्रमीची फुटबॉल व व्हॉलिबॉलची राष्ट्रीय खेळाडू आहे. भारतात खेळाडुंकडे फार उशिरा लक्ष दिले जाते, १६-१८ वयाच्या तरुणांकडून तयारी केली जाते, चीनमध्ये वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच तयारी सुरु केली जाते, त्यामुळे लहान मुलांसाठी आपण लखनौजवळ ‘पंडित चंद्रशेखर आझाद खेल अकादमी’ या नावाने मोफत प्रशिक्षण देणारी अकादमी सुरु करत आहोत, एकूण १६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. एका सामजिक कार्यकर्त्यांने त्यासाठी जमीनही दिली आहे. हॉलिवूडमधील चित्रपट कथेचे हक्क, आपल्या जीवनावर अधारलेल्या पुस्तकाची रॉयल्टी तसेच बॉलिवुडमध्येही निर्माण होणारा चित्रपटाच्या कथेचे हक्क यातून मिळणारा पैसा आपण या अकादमीसाठी वापरणार आहोत, असे तिने सांगितले. सातही खंडातील सर्वोच्च शिखर पदाक्रांत करणे हे आपले आगामी लक्ष्य आहे, त्याची सुरुवात टांझानियातील केरीमांझाऊ पर्वतारोहणाने करणार असल्याचे तिने सांगितले. युवकांनी जीवनात ध्येय ठेवावे, त्या ध्येयासाठी वेडे व्हावे, सतत लढावे, यश मिळेलच, असे स्पष्ट करुन अरुणिमाने सांगितले की, आपल्या यशापेक्षा स्नेहालय संस्थेचे काम मोठे आहे, या कार्याला माझा सलाम, या संस्थेतील मुलांना आपण आपल्या अकादमीत निश्चितच प्रशिक्षण देऊ. यावेळी संस्थेचे अजीव सदस्य कॅप्टन विठ्ठलराव सोसे यांनी अरुणिमाच्या कार्याला १ लाख रुपयांची मदत दिली. संस्थेचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी, डॉ. सतीश राजमाचीकर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2013 रोजी प्रकाशित
एव्हरेस्टवीरांगणा अरुणिमाच्या जीवनावर हॉलीवूड चित्रपट
एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची, जगातील पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा (लखनौ, उत्तर प्रदेश) हिच्या यशावर हॉलिवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
First published on: 18-08-2013 at 02:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood film on everest climber arunima