इचलकरंजी येथे बिलाच्या कारणावरून गुंडाने दमदाटी करत केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा मृत्यू झाला. सुंदर चंदू मुल्या (वय ६०,रा. हत्ती चौक) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मुल्या यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी उल्हास पाटील (रा. पाटील मळा, सांगली रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मुल्या यांच्या पत्नी वासंती यांनी पतीस मारहाण करणाऱ्या उल्हास पाटलासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच दमदाटी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन इचलकरंजी मालक हॉटेल असोशिएशनच्या वतीने देण्यात आले आहे.
इचलकरंजी-सांगली रोडवर सुंदर मुल्या यांचे नेत्रा नामक हॉटेल आहे. मुल्या यांचे जावई सतीश भास्कर कुलाल हे हॉटेल व्यवस्थापन बघतात. काल रात्रीच्या सुमारास उल्हास पाटील हा आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये मद्यप्राशन करीत बसला होता. त्या वेळी दारूचे बिल त्याने भागविले. त्यानंतर पुन्हा सिगारेट घेतली होती. सिगारेटच्या बिलाच्या कारणावरून उल्हास पाटील व कुलाल यांच्यात वादावादी झाली. त्या वेळी कुलाल यांनी सासरे सुंदर मुल्या यांना हॉटेलवर बोलावून घेतले. बिलाच्या कारणावरून पुन्हा सुंदर मुल्या व उल्हास पाटील यांच्यात वाद झाला. त्यामध्ये उल्हास पाटील याने मुल्या यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. या वेळी मुल्या यांचा रक्तदाब वाढल्याने ते जागीच कोसळले. तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मारहाणीच्या घटनेनंतर हॉटेलमधील काहींनी उल्हास पाटील याला मारहाण केली. त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत मुल्या यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुल्या यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी उल्हास पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या गुन्ह्यात काही जणांचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सतीश पोवार करीत आहेत. संशयित उल्हास पाटील याच्यावर यापूर्वी खंडणी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.