ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार
अलिबाग तालुक्यातील वेश्वीव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या कामांचा कार्यारंभ आदेश देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वेश्वी ग्रामपंचायतीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे अलिबाग तालुका चिटणीस योगेश मगर व काही वेश्वी ग्रामस्थ १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
वेश्वीतील ग्रामस्थांनी जनसुविधा योजनेअंतर्गत गोकुळेश्वर तलावाजवळील संरक्षण िभत व पायऱ्यांचे बांधकाम करणे या कामाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बठकीत जनसुविधा योजनेतून गोकुळेश्वर तलावातील या कामासाठी अकरा लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी जिल्हाधिकारी पातळीवरून ग्रामपंचायत स्तरापर्यंत येण्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालय ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे हा अकरा लाखांचा निधी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमध्ये जमा झाला. या कामाचे ग्रामपंचायतीने रीतसर ऑनलाइन पद्धतीने ईटेंडरिंग केले ;
परंतु काम मंजूर होऊन सात महिने उलटून गेले तरी वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी जाणूनबुजून ज्या संस्थेस हे काम मिळाले आहे त्या श्री हरिस्मृती मजूर सरकारी संस्थेला कार्यारंभ आदेश दिलेला नाही, असे योगेश मगर यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याकार्यकरी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे .
गोकुळेश्वर देवस्थान अलिबाग तालुक्यातील हजारो भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. येथे येणारे भाविक अभिषेक आणि पूजेसाठी लागणारे पाणी तलावातून घेत असतात. अतिशय धोकादायक परिस्थित भाविकांना तलावातून पाणी घ्यावे लागते. तसेच गणेशोत्सव, महाशिवरात्री आणि इतर धार्मिक विधींच्या वेळेला नागरिकांना तलावात उतरण्यास सुरक्षित जागा नाही. यामुळे गोकुळेश्वर तलावावर संरक्षक िभत आणि पायऱ्या होणे आवश्यक आहेत. येथील संरक्षक बंधारा व पायऱ्यांचे बांधकाम झाले असते तर नागरिकांनी चांगली सुविधा मिळाली असती. मात्र कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात हेतुपुरस्सर टाळाटाळ होत असल्याने हे काम रखडले आहे. याचा निषेध करण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी आपण व काही ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार आहोत.
यानंतरही कार्यारंभ आदेश दिला गेला नाही तर काही ग्रामस्थ तलावात आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे,असेही योगेश मगर यांनी पत्रात नमूद केले आहे.
वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत गोकुळेश्वर मंदिर परिसरात सरदार बिवलकर यांच्या काळापासून प्रसिद्ध असलेले गोकुळेश्वर मंदिर असून या मंदिराला लागून ऐतिहासिक तलाव आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ म्हणून हा परिसर तालुक्यात ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळेश्वर तलावातील गाळ काढलेला नाही त्यामुळे या सुंदर नसíगक स्थळाला बकालपणा आला आहे. गोकुळेश्वर तलावाचा गाळ काढून सुशोभीकरण करावे अशी येथील येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
याबात माझ्याशी कुणी संपर्क साधलेला नाही. मी सरपंचपदाची सूत्रे नुकतीच घेतली आहेत. याची संपूर्ण माहिती मी घेईन. मंजूर झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाऊ देणार नाही, असे वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आरती प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.