जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या युवकाचा हातात असलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रोहा तालुक्यात घडली आहे. रोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन शांताराम ठाकूर, सतीश धुमाळ व सुजय लक्ष्मण धुमाळ हे विरजोली कांढणे गावाच्या हद्दीत बुधवारी १३ फेब्रुवारी रोजी शिकार करण्यास गेले होते. रात्री ८.३० वाजता घरी येत असताना डोंगर उतरणीवर सुजय लक्ष्मण धुमाळ, वय ३८, रा. विरजोली याच्या पायाला ठेस लागल्याने तो खाली पडला. याच वेळी त्याच्या हातात असलेल्या बंदुकीच्या स्टिगरवर बोट पडल्याने बंदुकीतील गोळी सुटली व ती त्याच्या डाव्या पायाच्या मांडीत घुसल्याने गंभीर जखम होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव  झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या विषयासंबंधित रोहे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून रोह्याचे  पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. साळवी अधिक तपास करीत आहेत.