लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : मशागत केलेल्या शेतात वळवाच्या पावसासारखं येऊन खा. धैर्यशील माने पीक घेऊन गेले, मी मात्र बांधावरच राहिलो. मलाही खासदार व्हावं वाटतयं, आता माने यांनी पैरा फेडावा असे मत माजी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांनी केले.

इस्लामपूरमध्ये रयत क्रांती संघटनेच्यावतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी चौक येथे शेतकरी, कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, धैर्यशील माने, आ. गोपीचंद पडळकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, निशीकांत भोसले-पाटील यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आणखी वाचा-‘राजेश टोपेंची अजित पवारांबरोबर गुप्त भेट, मार्च महिन्यात विध्वंस दिसेल’, अमोल मिटकरींचा दावा

यावेळी प्रास्ताविक करताना श्री. खोत म्हणाले, मलाही खासदार होऊन दिल्लीला जावं वाटतयं. खा. माने खरचं भाग्यवान. वळवाच्या पावसाप्रमाणे आले, आणि मशागत केलेल्या रानात पीक घेऊन गेले. गेल्यावेळी आम्ही युतीमधून माने यांना भरघोस मदत केली आहे. यावेळी त्यांनी आम्हाला मदत करावी. गतवेळचा पैरा फेडावा. जर मला संधी मिळाली तर निश्‍चितच माने यांना खांद्यावर घेउन मिरवणुक काढेन. महायुतीने हातकणंगले मतदार संघातून आमच्या संघटनेला संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

शरद पवार यांना आता तुतारी हे चांगले चिन्ह भेटले आहे. तुतारी चिन्ह म्हणजे त्यांच्या आयुष्याची अखेरची घटका जवळ आल्याचेच निदर्शक आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातील शकुनी मामा असून राज्यात सध्या जो गोंधळ सुरू आहे त्यामागे त्यांचाव हात आहे अशी टीकाही खोत यांनी यावेळी केली. शेवटी महायुतीची उमेदवारी कोणालाही मिळाली तरी हातकणंगले मतदार संघातील महायुतीचा उमेदवार दीड लाख मतांच्या फरकाने विजयी होईल असा विश्‍वासही खोत यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा-रायगडकडे जाताना वाट वाकडी करून राजेश टोपे अजित पवारांच्या भेटीला

यावेळी आमदार पडळकर यांनीही पवार यांच्यावर टीका करताना राजकीय आयुष्याला ५६ वर्षे पुर्ण होत असताना नवीन तुतारी वाजविण्याची वेळ त्यांच्यावर आली, यामागे त्यांचेच राजकारण कारणीभूत असल्याचे सांगितले. केंद्रिय कृषी मंत्री असताना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांना लागू करता आल्या नाहीत, आणि आता मात्र शिफारसी लागू करण्याची मागणी कोणत्या तोंडाने करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्यच पुन्हा मोदींना संधी देण्यास कारणीभूत ठरणार आहे. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता कोणाही विरोधी पक्षाकडे नाही. काँग्रेसने घराणेशाही जपत भ्रष्ट कारभाराला पाठीशी घातले. ज्यांनी काही केलेच नाही, त्यांना चौकशीचे भय बाळगण्याचे कारणच काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I also want to become an mp says sadabhau khot mrj
First published on: 24-02-2024 at 18:33 IST