इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शनिवारी बिस्मिला अहमद मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. विरोधी शहर विकास आघाडीनेही नगराध्यक्षपदासाठी प्रथमच मुस्लीम समाजातील महिलेला संधी दिल्याबद्दल निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. मुजावर यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.
सुमन पोवार यांचा साडेचार महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी गत आठवडय़ात जिल्हाधिकारी माने यांचेकडे राजीनामा सादर केला. तो मंजूर करुन जिल्हाधिकाऱ्यानी नूतन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेपर्यंत सत्तारुढ काँग्रेसकडून बिस्मिला मुजावर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली होती. त्यामुळे आजच्या विशेष सभेत केवळ घोषणेची औपचारिकता बाकी राहिली होती.
निवडीनंतर अश्विनी जिरंगे यांच्या हस्ते मुजावर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपनगराध्यक्ष संजय कांबळे, गटनेते बाळासाहेब कलागते, माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे, रत्नप्रभा भागवत व सहकारी नगरसेविकांनी त्यांचे अभिनंदन केले. निवडीनंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली.