Eknath Shinde On Uddhav Thackeray : सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ होईल’, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे ऑडिट करायलाच पाहिजे. एकदा सिमेंट काँक्रीटचे रस्ते सुरु झाल्यानंतर २५ वर्ष त्यामध्ये कोणतीही दुरुस्तीची गरज नाही. मग असं असताना दरवर्षी दुरुस्ती करून त्या दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढण्याचं काम कोण करत होतं? आम्ही तर ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ने रस्ते धुण्यासाठी गेलो. पण तुमच्या लोकांनी तिजोऱ्या धुतल्या. आम्हाला पण बोलायला येतं. मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम कोणत्या ठेकेदाराला दिलं होतं? मग त्या ठिकाणी मराठी माणूस दिसला नाही का? मग तर त्या कामासाठी डिनो मोरिया दिसला. आता जर त्या डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ होईल”, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
“त्यामुळे आरोप करत असताना असे आरोप करा की, ‘जो खुद शीशे के घर में रहता है ओ दूसरो के घर पत्थर नहीं फेकता.’ आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करत आहोत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते कधी पाहायला मिळाले असते का? कोस्टल रोड वेगाने कोणी पूर्ण केला? पण तुम्ही जेव्हा एखाद्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप करता तेव्हा तुम्हाला देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारे कोण? हे पण सांगा. ही यादी काढा आणि त्यानंतर मराठी माणसांच्या मुद्यांवर बोला”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
“मराठी भाषेसाठी आम्ही काय केलं? हे आम्ही सांगितलं आहे. अभिजात भाषेचा दर्जा असेल, विश्व मराठी संमेलन असेल यासह अनेक गोष्टी आहेत. मराठी माणसांसाठी जे काम केलं ते सर्वांसमोर आहे. आम्ही कोणत्या कोणत्या योजना सुरु केल्या ते देखील सर्वांसमोर आहेत. आमचं काम बोलतंय. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमत दिलं. मग तुम्ही काय काम केलं आणि आम्ही काय काम केलं? हे पण या ठिकाणी सांगा”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आपण एक योजना देखील सुरू केली. पण काहींनी सोन्याची अंडी देणारी पालिका समजून मुंबईत काही लोकांनी काम केलं. तसेच गिरणी कामगारांच्या लोकांच्या प्रश्नाबाबत आजपर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. पण त्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण पत्राचाळ, बॉडी बॅग, खिचडी कंत्राटामध्ये कोणी पैसे खाल्ले”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. सभागृहात ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.