काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबरची आघाडी सहा महिन्यांपूर्वी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असता तर काँग्रेसच्या जागा विधानसभा निवडणुकीत वाढल्या असत्या, असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील यांनी शिर्डी येथे साईबाबा व शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. त्या वेळी ते अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते. संस्थानचे विश्वस्त सयाराम बानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाले, आघाडी तुटल्याने निवडणुकीची तयारी करता आली नाही. ऐनवेळी उमेदवार शोधावे लागले. राष्ट्रवादीला युती तोडायची होती तर ती आधीच तोडायची होती. युती तोडून त्यांनाही फायदा झाला नाही. आता लोक विकासाला महत्त्व देत नाहीत. मंत्री म्हणून आपण मतदारसंघात खूप काम केले, पण कामाला यश आले नाही. निवडणुकीत ऐनवेळी एखादा विषय पुढे येतो, त्यातून लाट तयार होते. प्रचार वेगळ्याच दिशेने नेला जातो. त्यामुळे विकासकामे बाजूला पडतात. त्याचे मतात रूपांतर होत नाही, असे शल्यही पाटील यांनी बोलून दाखविले.
पूर्वी निवडणुकीचा प्रचार घरोघर जाऊन करावा लागत असे. पण आता प्रचाराचे तंत्र बदलले, निवडणुकीची पद्धत दर पाच वर्षांनी बदलत आहे. सोशल मीडियामुळे मतदार आधीच मतदान कुणाला करायचे हे ठरवतो. माध्यमांमुळे त्याचे मत आधीच ठरते, असेही पाटील यांनी सांगितले.
शनिशिंगणापूर व शेगाव या दोन देवस्थानांचा कारभार चांगला सुरू असून भाविकांना सोयीसुविधा दिल्या जातात, स्थानिक माणसे असल्याने त्यांना समस्या कळतात, त्यातून मार्ग काढला जातो. शिर्डीच्या देवस्थानचे सरकारीकरण करूनही फारसा फायदा झालेला नाही असे मतही त्यांनी नोंदविले.