वातावरण महाराष्ट्रात इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर त्यांना मी सांगू इच्छितो की भगवा रंग एकच शिवसेनेचा. शिवसेना एकच आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले. एवढंच नाही महाविकास आघाडीसोबत सगळा महाराष्ट्र उभा आहे हे महाराष्ट्राने नुकतंच पदवीधर निवडणुकीत पाहिलं आहे. मी गेले सहा महिने सांगतो आहे की आज निवडणुका घ्या बघू कोण जिंकतं असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. नाशिकच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा भाषण करत आदित्य ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

४० गद्दार हे सांगू शकतात का?

महाराष्ट्रात जे वातावरण मी पाहतो आहे की गद्दारी जी झाली आहे ती कुणालाही पटलेली नाही. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे लोकांसोबत जाऊन उभा राहिलो तिथे मी सांगितलं की मी ठाम पणे उभा आहे. पाठीत खंजीर खुपसला नाही. असं ते ४० गद्दार सांगू शकतात का? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले मग गोव्याला गेले मग महाराष्ट्रात आले आज ते सांगू शकतात की आम्ही ५० खोक्यांना हात लावला नाही. आठ महिने झाले ही घोषणा लोक विसरलेलं नाही. एकही व्यक्ती अजून बोलला नाही मी खोक्यांना हात लावला नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्यकर्त्यांनी खोक्यांसाठी स्वतःला विकलं

आपल्या राज्यकर्त्यांनी खोक्यांसाठी स्वतःला विकलं आहे. खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या लोकांना आनंद व्हायला हवा होता. जेव्हा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत होतात याचं त्यांना काहीच वाटलं नाही? हे लोकं डरपोकसारखे सुरतला पळाले. मी तुमच्यासोबत राहणार आहे, इथेच राहणार आहे कारण माझी ताकद तुम्ही सगळे आहात असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्या सभांना लोक स्वतःहून येत आहेत आणि भेटून सांगत आहेत की शिवसेनेसोबत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवे मतदार आपल्याला जोडले जात आहेत

मला आज काही लोकांनी भेटून सांगितलं की आम्ही कधी शिवसेनेचे मतदार नव्हतो पण आम्ही आता शिवसेनेचे मतदार झालो आहोत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे काम केलं त्याचे आम्ही फॅन झालो आहोत असं लोक सांगत आहेत. याचं महत्त्वाचं कारण अत्यंत गलिच्छ राजकारण जे महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं ते आत्ता पाहण्यास मिळणार आहे. या गद्दारांना आपल्याला पळवून लावायचं आहे हे कुणी विसरू नका असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.