भाजपाच्या वाटेवर असलेले स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेना नेत्यांने खरपूस टीका आहे. राणे यांच्या भाजपातील प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले, युतीमध्ये सर्व काही गोड दुधासारखे सुरू आहे. त्यात नारायण राणे यांना युतीत घेणे म्हणजे दूधात मिठाचा खडा टाकण्यासारखेच आहे. पण मुख्यमंत्री असा निर्णय घेणार नाही, असा दावा त्यांनी केला.

‘स्वाभिमान’चे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सध्या सुरू आहे. राणे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमातही राणेनी तसे संकेत दिले होते. त्याचबरोबर कुठे जाणार आहोत याची घोषणा काही दिवसांत करू, असेही राणे म्हणाले होते. राणे यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेवर प्रथम शिवसेनेतील नेत्याने भाष्य केले आहे. राज्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसकर म्हणाले, भाजपा आणि शिवसेना ज्या पद्धतीने सत्तेत आली त्यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध कसे आहेत हे दिसून येते. युतीत सर्व काही गोड दुधासारख आहे. त्यात मिठाचा खडा कशाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुप चांगले निर्णय घेतले आहेत. असा निर्णय ते घेणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मिठाचा खडा म्हणत शिवसेनेने राणेंना आत्तापासूनच विरोध करणे सुरु केले आहे. यामुळे आता भाजप शिवसेनेचे ऐकणार की विरोध झुगारुन राणेंना भाजपमध्ये प्रवेश देणार हे काही दिवसात दिसून येणार आहे. नारायण राणे यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण तेव्हा राणेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला होता. पण आता पुन्हा राणे भाजपच्या वाटेवर असून, पक्षही विलीन करण्याची चर्चा सुरू झाली आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते असलेले राणे यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवले आहे. राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी काम केले आहे.