राज्यात गुटखा बंदी असताना अकोला जिल्ह्य़ात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या लाखो रुपयांच्या विक्रीस खुला आशीर्वाद असून पोलिस प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष आहे. राज्य सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात अधिकारी उदासीन का ,असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला. दरम्यान, गुटखा विरोधी कारवाई सुरु असल्याचा प्रशासनिक दावा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ताथोड यांनी केला.
राज्यात गुटखा बंदीचा मोठा गाजावाजा केला गेला. पण, हा गाजावाजा पोकळ असल्याचे सिध्द होत आहे. राज्याच्या धोरणांना अधिकाऱ्यांनी थेट वाटाण्याच्या अक्षता लावत घरचा अहेर दिला. अकोल्यात सर्वच पान दुकानांवर मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा साठा असून त्याची खुलेआम विक्री होत आहे. ही विक्री कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न या निमित्त समोर आला. हैदराबाद येथे डिलर असलेल्या येथील एका हा सर्व साठा स्थानिक पान मंदिर चालकांना उपलब्ध केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातील काही अधिकारी व पोलिस ठाण्याचे काही ठाणेदार यांच्या आशिर्वादाने ही गुटखा विक्री खुलेआमपणे सुरु आहे.
अकोल्यात मोठय़ा प्रमाणात हैदराबाद येथून गुटखा येतो. यासाठी काचीगुडा अकोला या रेल्वे गाडीचा सर्रास वापर होतो. या रेल्वेगाडीतून मोठय़ा प्रमाणात अकोल्यातील शिवनी, बार्शिटाकळी व शहरानजीकच्या काही भागातून तस्करी करण्यात येते. यासाठी काही ट्रान्सपोर्ट चालकांचे सहकार्य मिळत आहे. संबंधीत काही पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना या गुटखा तस्करीची माहिती असून त्यांची डोळेझाक का असा प्रश्न अनेकांना पडला.
गुटखा तस्करीच्या या गोरखधंद्यात येथील दिलीप नावाच्या व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. या गुटखा तस्करीतून मोठय़ा प्रमाणात पैसा जमा करण्यात त्याचा पुढाकार असल्याची माहिती मिळाली. अकोल्यातील सिंधी कॅम्प, डाबकी रोड स्थित भगतवाडी, मोहम्मद अली चौक, अकोट फैल येथे मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा साठा आहे. सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत येथील सराफा गल्ली मागील नमकीन अर्थात खाऊ गल्लीत लाखो रुपयांची गुटख्याची उलाढाल होते. पण, येथील एका बडय़ा व्यापाराविरोधात पोलिस यंत्रणेबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाचे हात सरसावत नाही. इतकी दहशत संबंधित ट्रेडर्स चालकाची आहे.
गुटखा विक्री करणारे मोठे ट्रेडर्स व त्यांच्या गोदामांची माहिती स्थानिक प्रशासनातील संबंधीत विभागाला आहे. पण, त्या विरोधात कारवाई करण्यास अन्न व औषध प्रशासन प्रशासनाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष आहे.
गेल्या काही दिवसात स्थानिक बाजारपेठेतील गुटख्याचा व्यापार मंदावला. त्यामुळे बाजारपेठेतील भाव घसरले. पण,छोटय़ा ग्राहकाला मात्र चढय़ा दरात गुटखा विकत घ्यावा लागत आहे.
दुप्पट झाले भाव
बाजारपेठेतील गुटखा पुडय़ांची किंमत पाहिल्यावर त्या महाग झाल्याची माहिती मिळाली. ठोक बाजारपेठेत विमल या गुटख्याचे पॅकेट ८५ रुपयांवरून १२० रुपये, माणिकचंद (मोठी) ५५४ रुपयांवरुन ९०० रुपये, माणिकचंद (छोटी)३२४ रुपयांवरुन ५५० रुपये, सितार ७२ रुपयांवरुन १०० रुपये किंमतीत मिळतात. त्याच वेळेस लहान ग्राहकांस याच पुडय़ांसाठी मोठी किंमत द्यावी लागते. यात विमल ५ रुपये, माणिकचंद मोठी २०, छोटी १० ते १२ रुपये तर, सितार ३ ते ३.५० रुपयात मिळत आहे. गुटख्यांची होणारी ही सर्रास विक्री राज्य सरकारच्या धोरणांना मुठमाती देत आहे.