आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांचा जामिया मिलिया विद्यापीठातील आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण

नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू केल्यानंतर ईशान्ये भारतात हिंसाचार उफाळून आला. याचे रविवारी लोळ दिल्लीतही पोहोचले. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत धरपकड आणि धुमश्चक्री सुरू होती. दरम्यान, जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर आसाम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम नागालँड, मिझोराम यासह सात राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. मागील आठवड्यापासून ईशान्य भारतात हिंसेचा उद्रेक झाला आहे. जाळपोळीचं सत्र सुरू असताना रविवारी दुपारनंतर राजधानी दिल्लीतही तणाव निर्माण झाला. नागरिकत्व कायद्याला विरोध करत दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनावेळी दिल्ली पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. यात चार बससह अनेक वाहने पेटवून देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जामिया विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांची धरपकड केली. यावेळीही लाठीमार करण्यात आला. या घटनेचा विद्यापीठाच्या कुलगुरूनीही निषेध केला.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री हातात मशाली घेऊन रॅली काढत जामियातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर #IITBombay असा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. यात अनेकांनी विद्यार्थ्यांचं कौतूक केलं आहे. तर काहीजणांनी टीकाही केली आहे.

दिल्लीतील घटनेचे पडसाद अलिगढ मुस्लिम विद्यापीठातही उमटले. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी याचा निषेध केला. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुट्या जाहीर केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Iit bombay student support jamia millia protest bmh

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या