म्हैसाळ गर्भपात प्रकरणी सांगलीतील औषध पुरवठादाराला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची तीन दिवसांसाठी बुधवारी पोलीस कोठडीत रवानगी केली. गर्भपातासाठी मिझोफ्रास्ट ही गोळी या पुरवठादाराकडून उपलब्ध करून डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेला दिली असल्याची माहिती औषध विक्रेता सुनील खेडेकर याने जबाबात सांगितल्याने आज ही अटक करण्यात आली.
एका विवाहित महिलेचा गर्भपात करीत असताना मृत्यू झाल्याने म्हैसाळचे गर्भपात प्रकरण गाजत आहे. या अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी आजअखेर एका महिलेसह ११ जणांना अटक केली असून यामध्ये तीन डॉक्टर, ४ दलालांचा समावेश आहे. आज सांगलीचे औषध पुरवठादार भरत शोभाचंद गटगटे (वय ४८) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आज याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला.
औषध पुरवठादार गटगटे यांने महाराष्ट्रात बंदी असलेली गर्भपात निरोधक गोळी मिझोफ्रास्ट याचा पुरवठा वादग्रस्त डॉ. खिद्रापुरेला केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तशी माहिती औषध विक्रेता खेडेकर याच्याकडून माहिती मिळाल्याने पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, म्हैसाळच्या वादग्रस्त ठरलेल्या भारती हॉस्पिटलप्रकरणी जिल्हा आरोग्य विभागाचा अहवालच अद्याप मिळाला नसल्याचे होमिओपॅथिक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या अवैध गर्भपाताची कौन्सिलने गंभीर दखल घेतली असून अहवाल प्राप्त होताच डॉ. खिद्रापुरेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
डॉ. खिद्रापुरे यांने होमिओपॅथीची पदवी घेतली असून महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिलकडे नोंदणी केली होती. मात्र ही नोंदणी पाच वर्षांसाठी असल्याने याची मुदत गेल्या वर्षीच संपली आहे. हा अवैध गर्भपाताचा प्रकार लक्षात घेऊन कौन्सिलने परवाना निलंबित केला असून आरोग्य विभागाचा अहवाल येताच तत्काळ नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असे डॉ. फुंदे यांनी सांगितले.