scorecardresearch

आर्वीच्या कदम कुटुंबाच्या कृत्याने समाजात संताप

गर्भपातविषयक तीनही कायद्यानुसार या गैरकृत्यात आरोपी असलेल्या विरोधात शासकीय आरोग्य यंत्रणेला चौकशी करून पोलीस तक्रार करावी लागते

(प्रातिनिधिक छायाचित्र)

|| प्रशांत देशमुख

वर्धा : घरातील ज्येष्ठ अनुभवाच्या आधारे सल्ला देत नवीन पिढीचा मार्ग सुकर करीत असतात. पण, सल्लाच नव्हे तर वाईट कृत्याचा आग्रह धरीत पुढील पिढीच्या जीवनावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ज्येष्ठ असले की संपूर्ण कुटुंबाचे कसे वाटोळे होते, याचे उदाहरण आर्वीच्या कदम कुटुंबात दिसून आले. कुटुंबप्रमुख डॉ. कुमार्रंसह कदम, पत्नी डॉ. शैलजा, मुलगा डॉ. नीरज व सून डॉ. रेखा यांनी मिळून चालवलेला अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील जनमानस स्तब्ध झाले. वैद्यकीय विश्व हादरले.  आर्वीत १२ कवट्या व ५५ हाडे सापडल्याने ही नगरीही हादरली.

एका अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपातात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलीस तक्रार झाली. त्यानंतर डॉ. रेखा कदम यांना पोलिसांनी अटक केली. या अनुषंगाने पोलिसांनी कसून तपास केला  तेव्हा गोबरगॅसच्या खड्ड्यात हाडांचा ढीग आढळून आल्याने कदमांची  कृत्ये चव्हाट्यावर आली. डॉ. कुमार कदम वगळता इतर तीनही कदम प्रसूती तज्ज्ञ आहेत. गर्भपात व गर्भनिदान केंद्र डॉ. शैलजा यांच्या नावे असून त्याच परवान्यावर डॉ. रेखा या गर्भपात कारीत असल्याचे चौकशीत आढळून आले. वैद्यकीय कायद्यानुसार, केंद्राचा परवाना असल्याने एकापेक्षा अधिक डॉक्टर गर्भपात करू शकतात. मात्र परवान्यावर सहाय्यक म्हणून नोंद अनिवार्य असते. ती तशी  नसल्याने डॉ. रेखा मुख्य आरोपी झाल्या. या कृत्यात सहआरोपी म्हणून पती डॉ. नीरज याला रविवारी अटक झाली. या दोघांच्या कृत्यास ४० वर्षांपासून केंद्र चालवणाऱ्या  डॉ. शैलजा यांचेही सहकार्य असल्याने त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी झाली. त्या रुग्णालयात दाखल झाल्याने तूर्तास त्यांची अटक टळली. हा गोरखधंदा सर्रास चालत असल्याची उघड चर्चा होत आहे. आर्वी सामान्य रुग्णालयात अर्धवेळ प्रसूती तज्ज्ञ म्हणून सेवा देणाऱ्या डॉ. नीरजने कायदेशीर गर्भपात सामान्य रुग्णालयात तर बेकायदेशीर स्वत:च्या रुग्णालयात करण्याचा खेळ चालवला होता. कदम रुग्णालयात गर्भपातास आवश्यक अशा औषधांचे शेकडो डबे आढळल्याने आरोपी सराईत गुन्हेगार ठरले.

चौकशी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या अनुषंगाने सुरू आहे. गर्भपातविषयक तीनही कायद्यानुसार या गैरकृत्यात आरोपी असलेल्या विरोधात शासकीय आरोग्य यंत्रणेला चौकशी करून पोलीस तक्रार करावी लागते. गर्भपात केंद्राचा मुदतबाह्य परवाना, गर्भपाताच्या नोंदी, मृत अर्भकाची विल्हेवाट, अवैध औषधी अशा वैद्यकीय बाबींची चौकशी आरोग्य खाते करीत आहे. ती पूर्ण होऊन तक्रार झाल्याखेरीज पोलिसांचा तपास अपूर्ण ठरतो. विशेष म्हणजे, अशा केंद्राची दर तीन महिन्यांनी तपासणी आवश्यक ठरते. मात्र ९ महिन्यांपासून तपासणी झालीच नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे नेहमी वादात असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या कारभारावर परत वादळ घोंघावणार असे दिसते. हाडांचा ढीग सापडल्याने कदम रुग्णालयातील अवैध धंदे किती वर्षांपासून सुरू होते व त्याला कोणत्या शासकीय यंत्रणेचे पाठबळ होते, हा प्रश्न वैद्यकीय वर्तुळाला पडला आहे. डॉ. नीरज याने आर्वीसोबतच आष्टी, कारंजा व लगतच्या अमरावती जिल्ह्यात एजंट नेमल्याचे सांगितले जाते. अल्पवयीन पीडिता कदमकडे येण्यापूर्वी आर्वीतील एका महिला डॉक्टरकडे  गेली होती. त्या डॉक्टरने सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्यानंतर कदम रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. असे का, या शंकेवर बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख म्हणतात, हा सगळा प्रकार एजंटमार्फत  अनेक वर्षांपासून सुरू होता. आरोग्य व अन्य यंत्रणांनी सोयीनुसार त्याकडे दुर्लक्ष केले. गर्भश्रीमंत म्हणून ओळख असलेल्या कदमांच्या तºहेवाईक वागणुकीचा अनेकांना फटका बसला. रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक झाली.

पण रुग्णालय सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस सुद्धा झाली पाहिजे, असाही एक मतप्रवाह आहे. शिवसेनेच्या पूर्व विदर्भाच्या प्रवक्त्या शीला बोडखे यांनी गृहमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून कदम प्रकरणात पोलीस व आरोग्य विभागातील दोषींना जबाबदार ठरवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal abortion of a minor girl cheating police complaint doctor arrested akp

ताज्या बातम्या