अहिल्यानगरः जिल्ह्यात खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने सुरू केले असून, ऐनवेळी मागणी वाढून खताचा तुटवडा भासू नये, खताचा काळाबाजार, लिंकिंग पद्धतीने विक्री होऊ नये यासाठी दक्षता म्हणून सुमारे ७ हजार १०० मे. टनाचा रासायनिक खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) जिल्ह्यात निर्माण केला जाणार आहे. त्यामध्ये डीएपी खत १ हजार मे. टन, तर युरियाचा ६ हजार १०० मे. टनाचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना पिकांसाठी खताची गरज लागते ती जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून. ऐनवेळी मागणी वाढून खताचा तुटवडा जाणवतो. त्यातून काळाबाजार होतो. हा प्रकार टाळण्यासाठी एप्रिलपासूनच मागणी असणारे डीपीए व युरियाचा संरक्षित साठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३ हजार मे. टनाचा साठा निर्माण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.
राज्य सरकारनेही संरक्षित साठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संरक्षित साठ्याचा वापर ऐन हंगामात चणचण भासल्यास खुला केला जाणार आहे. खरीप हंगामात येणाऱ्या अडचणीचा विचार करून डीएपी व युरियाचा संरक्षित साठा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्ह्यात हा साठा करण्यात येणार आहे. डीएपीचा १ हजार मे. टन साठा विविध ठिकाणी केला आहे. त्यात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे ३०० मे. टन, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडे ४०० मे. टन, तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे ३०० मे. टन डीएपीचा संरक्षित साठा करण्यात येणार आहे.
युरियाचा ६ हजार १०० मे. टन साठ्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे २ हजार ६०० मे. टन, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडे २ हजार ५०० मे. टन, तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे १०० मे. टन संरक्षित साठा करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय संरक्षित साठा पुढीलप्रमाणे (आकडे मे. टनमध्ये): अहिल्यानगर- डीएपी ७०, युरिया ३९६, पारनेर- डीएपी ७०, युरिया ४१५, पाथर्डी- डीएपी ६२, युरिया ३९९, कर्जत- डीएपी ७०, युरिया ४३१, जामखेड – डीएपी ८०, युरिया ४०६, श्रीगोंदा – डीएपी ६२, युरिया ४४१, श्रीरामपूर – डीएपी ६५, युरिया ३८२, राहुरी – डीएपी ७०, युरिया ३७५, नेवासा – डीएपी ७५, युरिया ४६०, शेवगाव – डीएपी ७०, युरिया ४६०, संगमनेर – डीएपी ८१, युरिया ५१०, अकोले- डीएपी ८५, युरिया ६००, कोपरगाव – डीएपी ७०, युरिया ४०८, राहाता – डीएपी ७०, युरिया ४१७ मे. टन.