बीड : कृष्णा उत्तीर्ण झाला अन ग्रामस्थांनी पेढे वाटून, हलगी लावून त्याची मिरवणूक काढली. “आमचा लुब्बाभाई दहा वेळा नापास झाला पण अकराव्या वेळी अखेर पठ्ठ्याने मैदान मारलेच, माऊंट एव्हरेस्ट सर केले, अशा ठसठशीत ओळी लिहिलेले अभिनंदनपर फलक गावभर लावल्याचे एक अजब उदाहरण परळी तालुक्यातील डाबी गावात साेमवारी पाहायला मिळाले आणि कृष्णा नामदेवराव मुंडे हा तरुण तालुक्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला.

कृष्णा मुंडे याने अकराव्या प्रयत्नात दहावीची परीक्षा उत्तीर्ण हाेण्यात यश मिळवले. दहा वेळा परीक्षा देऊनही हाती अपयश आलेले कृष्णा हे एक अजब उदाहरण म्हणून ग्रामस्थांमध्ये चर्चा चालायची. कृष्णाचा गावमित्र मंगेश मुंडे यांनी सांगितले की, आपल्या मुलाने किमान दहावी तरी उत्तीर्ण व्हावे, ही त्याच्या मजुरी करणारे, जेमतेम काही गुंठ्ठे खडकाळ जमीन असलेल्या वडिलांची तीव्र इच्छा. मात्र, कृष्णाला अभ्यासात फार गती नव्हती. त्याचे सुरुवातीला इतिहास, नंतर हिंदी, मराठी, असे प्रत्येक वर्षी याप्रमाणे विषय निघत गेले. मार्चमध्ये त्याने एकच विषय राहिलेल्या गणिताची परीक्षा दिली हाेती. ताेही आता निघाला. कृष्णाला ४९ टक्के गुण मिळाले आहेत. त्याची घरची परिस्थिती अगदीच जेमतेम असल्याने ग्रामस्थांकडूनही आर्थिक मदत घेत त्याला दहावीत उत्तीर्ण हाेण्यासाठी हातभार लावण्यात आला.