सांगली : पावसाने दिलेली उघडीप, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंदावलेला पावसाचा जोर यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला असला तरी कृष्णेची पाणी पातळी इशारा पातळीकडे जात आहे. आजअखेर वारणा व कृष्णा नदीपात्रातील पाणी वाढत असल्याने महापालिका क्षेत्रातील ४९४ आणि वारणातीरावरील २०१ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच २६१ जनावरांनाही हलविण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने नदीतील पाणी पातळी तासा-तासाला वाढत आहे. अशातच कोयनेतून ३२ हजार १००, कण्हेरमधून ५७०२, तारळीतून ५६६२ आणि चांदोलीतून १५ हजार ७८५ क्युसेकचा विसर्ग प्रतिसेकंद केला जात आहे. यामुळे पाणी पातळी वाढत आहे. सांगलीतील आयर्विन पूलाजवळ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ३८ फूट ८ इंच झाली असून ही पातळी ३९ ते ४० फूटापर्यंत जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तवली आहे. सांगलीतील इशारा पातळी ४० तर धोका पातळी ४५ फूट आहे. यामुळे आज रात्रीपर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. यामुळे सांगलीतील पाटणे प्लॉट, रामनगर, सुर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड, काकानगर आदी भागात पूराचे पाणी शिरले आहे. या ठिकाणी वास्तव्य असलेल्या नागरिकांचे महापालिकेच्या शाळेतील निवारा केंद्रावर स्थलांतर करण्यात आले आहे.
वारणा नदी दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोर ओसरला असला तरी नदीतील पाणी पातळी धरणातील विसर्गामुळे स्थिर आहे. शिराळा तालुक्यातील काळुंद्रे, सोनवडे, चरण, नाठवडे, चिंचोली, वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी येथील पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे १९८, महाबळेश्वर येथे २६७ तर नवजा येथे १७२ मिलीमीटर पाऊस आज सकाळी आठवाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात झाला तर चांदोली येथे १६८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरला असून कोयनेतून करण्यात येणारा १० हजार क्युसेकचा विसर्ग स्थगित करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे.