Eknath Shinde and Uddhav Thackeray: ‘राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो’, हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. या वाक्याला साजेशी उदाहरणे मागच्या काही काळात राजकारणात घडलेली आहेत, घडत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेचे पडघम वाजू लागताच योगायोगाने मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील अंतर कमी झाल्याचे दिसले. १८ वर्षांनंतर दोन्ही भाऊ एका विषयासाठी एकाच मंचावर आले. त्यांच्यात संभाव्य युती होईल, अशी चर्चा आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात बोलत असताना भाषणात राजकीय टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचे आवाहन केले. आता शिवसेनेतील (शिंदे) नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही अशाच प्रकारचे भुवया उंचावणारे विधान केले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवच्या दौऱ्यावर असताना त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना सदर विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात शनिवारी झालेल्या एका आकस्मिक भेटीबद्दल प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ‘आमच्या भेटीच्या बातम्या बघून काही नेते गावाला निघून जातील’, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले होते.
आदित्य ठाकरेंच्या विधानावर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. कालपरवा विधिमंडळात भाषण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते. ‘२०१९ पर्यंत आम्ही तरी विरोधात येऊ शकत नाही, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही याबाजूला (सत्ताधारी बाकावर) येऊ शकता’, असे म्हटले होते, याची आठवण प्रताप सरनाईक यांनी करून दिली.
तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंही एकत्र येतील
विधिमंडळात शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसायला नकार दिला होता. तसेच हे दोन नेते एकमेकांना नमस्कारही करत नाहीत, असा प्रश्न विचारला असता प्रताप सरनाईक म्हणाले की, आज जे चित्र दिसते, तेच उद्या असेल असे नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचेच पाहा. १९ वर्षांपूर्वी वेगळे झाल्यानंतर तेही एकमेकांकडे पाहत नव्हते. हसत नव्हते. आता ५ जुलै रोजी मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही होऊ शकतो. पण त्यासाठी वाट पाहावी लागेल.
राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र राहत नाही, या वाक्याचा उल्लेखही प्रताप सरनाईक यांनी केला. ते म्हणाले, मी आणि जितेंद्र आव्हाड बालमित्र आहोत. पण मागच्या नऊ वर्षांत आमच्यातून विस्तवही जात नव्हता. आमचे पटत नव्हते. पण शेवटी नऊ वर्षांनंतर काही ना काही निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र आलो.
मी रमी खेळाचे समर्थन केले नाही
दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाइलवर गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. आमदार रोहित पवार यांनी दावा केला होता की, कोकाटे मोबाइलवर रमी गेम खेळत होते. यानंतर प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. यावरही त्यांनी पुन्हा भाष्य केले. ते म्हणाले, मी कुठल्याही खेळाचे समर्थन केले नाही. ऑनलाइन रमी खेळाची जाहिरात सेलिब्रिटी करत असतात. रमी खेळ मीही कुटुंबियांबरोबर कधीतरी खेळत असतो. हा खेळ कौटुंबिक पातळीवर योग्य आहे, पण त्याला जुगाराचे स्वरुप देणे चुकीचे आहे.