अकोले: रस्त्याअभावी एका आदिवासी महिलेची जंगल वाटेतच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील जांभळे गावाच्या शिवारात घडली. एका संवेदनशील शिक्षकाच्या मदतीमुळे नंतर ही महिला नवजात बाळासह तातडीने आरोग्य केंद्रात पोहचली. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. मात्र, या घटनेमुळे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांच्या रस्त्यांची दयनीय स्थिती पुन्हा एकदा पुढे आली आहे.

तालुक्याच्या दक्षिण भागातील जांभळे गावच्या ठाकरवाडीत ही घटना घडली. ३०-४० घरांची ही वाडी गावापासून दूर डोंगरदरीत दुर्गम भागात आहे. या वाडीतील एका गर्भवतीची तब्येत बिघडल्यावर तिच्या पतीने मुख्याध्यापक राज गवांदे यांना मदतीची विनंती केली. गवांदे संबंधित वाडीसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यापर्यंत वाहनासह येऊन थांबले. मात्र, या वाहनापर्यंतचे तब्बल २ ते ३ किलोमीटरचे अंतर हे गरोदर महिलेस चालत पार करावे लागणार होते. तेव्हा त्या गर्भवती महिलेला अन्य महिला डोंगरघाटातून पायी चालत घेऊन येत होत्या. दरम्यान, या महिलेला वाटेत प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिची वाटेतच प्रसूती झाली.

दरम्यान, गवांदे यांनी ब्राह्मणवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका पाठविली. ही रुग्णवाहिका देखील रस्ता उपलब्ध असलेल्या भागापर्यंत येऊन थांबली. अशा स्थितीत संबंधित महिलेला तिच्या नवजात बाळासह रुग्णवाहिकेपर्यंत पुन्हा कसेबसे आणण्यात आले. दरम्यान, कच्च्या रस्त्यावर आणलेली ही रुग्णवाहिका पुन्हा चिखलात अडकली. तिला गावातील तरुणांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या सर्व संकटांवर मात करत नवजात बाळ आणि माता आरोग्य केंद्रापर्यंत सुखरूपपणे पोहचविण्यात यश आले. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे समजते. या प्रसंगात मदत करणारे गवांदे हे या दाम्पत्याचे शिक्षक होते. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रस्त्यामध्ये वनखात्याची अडचण

या घटनेमुळे ठाकरवाडीच्या अर्धवट रस्त्याचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. सरकार दरबारी अनेकवेळा पाठपुरावा करूनही वनखात्याच्या अडचणीमुळे रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने वाडीचा हा २ किमी लांबीचा अवघड घाट रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे काम थांबले. वाडीचा हा परिसर दाट जंगलाचा असून, वाडीतील लोकांना जंगलातील पायवाटेने जा-ये करावी लागते. पावसाळ्यात लोकांचे फारच हाल होतात. आजारी, वयस्कर व्यक्तींना डोली करून न्यावे लागते. – राज गवांदे, मुख्याध्यापक

जांभळे (ठाकरवाडी) येथील महिलेची रस्त्याअभावी जंगलात प्रसूती झाली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अकोले विधानसभा मतदारसंघात इतकी वर्षे आदिवासी मंत्रिपद असतानाही या भागातील मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. मागील पंचवार्षिकमध्ये दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास निधी अकोल्यात आला. यात प्राधान्यक्रमाने आदिवासी वाड्यावस्त्यांचे प्रश्न सोडविले असते, तर रस्त्याअभावी एखाद्या महिलेला जंगलात प्रसूत होण्याची वेळ आली नसती. – मारुती मेंगाळ, माजी उपसभापती, पंचायत समिती, अकोले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेच्या चार ते पाच दिवस आधी आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेची तपासणी केली. त्यावेळेस प्रसूती कळा येण्याची लक्षणे नव्हती तिची प्रसूतीची नियोजित वेळ १६ जून होती. परंतु, तत्पूर्वीच प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येण्यासाठी रुग्णवाहिका पाठवली गेली. मात्र, रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वीच संबंधित महिलेची रस्त्यात प्रसूती झाली होती. – अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नंदकुमार नेहरकर.