कर्जत : जामखेड जवळील जांबवाडी येथे मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज बुधवार दि. १५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण बोलेरो जीपने जामखेडकडे येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने पन्नास फूट खोल विहिरीत जीप पडली. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले. त्यांनी तात्काळ चौघांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले. अशोक विठ्ठल शेळके (वय २९ रा. जांबवाडी) रामहरी गंगाधर शेळके (वय ३५ रा. जांबवाडी) किशोर मोहन पवार (वय ३० रा. जांबवाडी) चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५ रा. राळेभात वस्ती) अशी मृतांची नावे आहेत.

घडलेली घटना अशी की, चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता. पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सुरू आहे. नेहमीप्रमाणे काम संपवून ते सर्वजण बोलेरो जीपने (क्रमांक एमएच. २३ ए.यु. ८४८५) मातकुळीकडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जीप पडली. यावेळी एकच मोठा आवाज झाला. जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरू असल्याने तेथील मजूर घटनास्थळी धावले व विहिरीत पडलेल्या चारही तरूणांना त्यांनी बाहेर काढले. चौघांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पुर्वीच चौघांचाही मृत्यू झाला होता. अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे.

हेही वाचा : Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.