राहाता : गुजरात राज्यातील सुरत येथील साईभक्त शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चारचाकी वाहनातून येत असतांना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात त्यांचे चारचाकी वाहन अज्ञात तरुणांनी अडवून बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या, चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते.या घटनेप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी साईभक्तांना लुटण्या बरोबरच संगमनेर, घोटी व वैजापूर येथील रस्तालुटीच्या घटनेची कबुली दिली आहे.

विजय गणपत जाधव, (वय २९ रा.गोंधवणी, श्रीरामपूर), सिध्दार्थ भाऊसाहेब कदम, (वय २९ ), राहुल संजय शिंगाडे, (वय ३५ ), सागर दिनकर भालेराव, (वय ३०), समीर रामदास माळी, (वय २६ ) दोन विधीसंघर्षित बालक (सर्व रा.पोहेगाव, ता.कोपरगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून ९ लाख रुपये किंमतीची पांढरे रंगाची इर्टिगा कार (क्रमांक एमएच-४१ -व्ही-२८१७ ), ४५ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल, दोन एअर गण, तीन लोखंडी कत्ती, पिवळया धातुच्या अंगठया व चैन असा एकुण ९ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोहित महेश पाटील, (वय २५, रा.दिंडोली, जि.सुरत, गुजरात) हे लासलगाव-कोपरगाव मार्गे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतांना अज्ञात आरोपीतांनी इर्टिगा कारने पाटील यांना आडवून, त्यांना गन, गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून आरोपी फरार झाले होते. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला माहिती मिळाली की, विजय गणपत जाधव, (रा.श्रीरामपूर) याने त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केला असून ते पांढरे रंगाची इर्टिगा कारमधुन (लासलगाव, जि.नाशिक) येथून शिर्डीच्या दिशेने येत आहेत.पथकाने शिर्डी येथील कारवाडी फाटयाजवळ सापळा रचून विजय जाधव याच्यासह साथीदारांना ताब्यात घेतले. गुन्हयाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी त्यांचेकडील जप्त करण्यात आलेल्या हत्याराने चार चाकी गाडीच्या काचा फोडून सदरचा गुन्हा केल्याची कबुली देत संगमनेर तालुका, (घोटी, जि.नाशिक) व वैजापूर (जि.छत्रपती संभाजीनगर) येथेही गुन्हे केल्याचे कबुली दिली.

दरोडा व जबरी चोरीचे वरिल चारही गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींनी गुन्हयातील रोख रक्कम आपसामध्ये वाटुन घेतली असून सोन्या चांदीचे दागीने हे नाशिक येथील राजेंद्र बंधु यांना विक्री केले व त्यातुन आलेली रक्कम देखील एकमेकांत वाटुन घेतली असल्याची माहिती सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताब्यातील आरोपीतांना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तपासकामी मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,श्रीरामपूरचे अपर पोलीस अधिक्षकवैभव कलुबर्मे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरीष वमने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.