सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतविभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षाने उमेदवार उभा केला नाही. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी हिंदुत्वाचा सूर आळवत मशिदींतून पंतप्रधान नरेद्र मोदी यांना हरविण्यासाठी काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे फतवे निघत असल्याचा आरोप केला. तर शहर काझी मुफ्ती अहमदआली काझी यांनी सातपुते यांचा हा आरोप स्पष्ट शब्दात फेटाळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर आघाडी करून एक लाख ७० हजार मते घेतली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना मतविभागणीचा मोठा फटका बसून पराभव पत्करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे एमआयएमने उमेदवार उभा केला नाही. दरम्यान, मशिदींमधूनही मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीने प्रबोधन केले जात आहे.

हेही वाचा…सुशीलकुमारांची भाजपच्या दिवंगत माजी खासदाराच्या घरी भेट

यासंदर्भात बोलताना भाजपचे राम सातपुते यांनी मशिदींतून काँग्रेसला मतदान करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. मशिदींमधून एखाद्या पक्षाला मतदान करण्यास सांगणे हा राज्य घटनेचा अवमान असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या मुद्यावर हिंदू मतदारांनी बोध घेऊन एकत्र यावे आणि भाजपला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

खासदार झालो तरी फेटा बांधणार नाही

मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाचा भाजपच्या विरोधात रोष वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राम सातपुते यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडली. एवढेच नव्हे तर जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत खासदार झालो तरी डोक्याला फेटा बांधून घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा…मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले

सातपुतेंचा खोटा प्रचार

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी शासनस्तरावर कार्यक्रम राबविले जातात. मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सार्वत्रिक प्रबोधन होणे अपेक्षित आहे. याच प्रामाणिक भूमिकेतून मशिदींमधून मतदानासाठी आवाहन केले जात असेल तर त्यात चूक नाही. मतदानासाठी फतवे काढले जात नाहीत. परंतु याउलट मुस्लीम समाजाविषयी तद्दन खोटा प्रचार करून आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा, पर्यायाने धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होत आहे. त्यास कोणीही बळी पडू नये. -मुफ्ती अहमदअली काझी, शहर काझी, सोलापूर

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur bjp candidate ram satpute alleges mosques issuing fatwas to vote for congress city qazi denies accusations psg