राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा घसरला असून हवेत गारवा जाणवू लागला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी सर्दी, खोकला, ताप, अपचनाचा त्रास, हात-पाय दुखणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. काहींचा ताप पाच ते सहा दिवस राहत असल्याच्या तक्रारींतही वाढ झाली असून शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.
बुलढाण्यात अनेक ठिकाणी जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी कडक ऊन तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असल्याने आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दररोज शासकीय रूग्णालयांमध्ये ओपीडीमध्ये रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
करोना संसर्गाच्या भीतीने खामगाव रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या संशयित रुग्णांचे प्रमाणही वाढत चालल्यामुळे रुग्णालयांवरील ताणही वाढला आहे. सर्दी, खोकला, तापासारख्या आजारांवर औषधांच्या दुकानातून गोळ्या घेऊन उपचार करण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र सध्या असे त्रास वाढल्यास नागरिक उपजिल्हा रुग्णालयांत धाव घेत आहेत. एकट्या खामगावच्या रुग्णालयात करोनाचे १०० च्या वर रुग्ण दाखल आहेत. संशयित रुग्णाना दाखल करण्याचे प्रमाणही वाढत आहे.