पंढरपूर : येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ऑनलाईन बुकिंग संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच वेळ देखील वाढवून दिला आहे. रोज ३ हजार ६०० भाविकांना ऑनलाईन दर्शन बुकिंग करता येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ही सोय उपलब्ध आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. मात्र, याचा फटका दर्शन रांगेतील भाविकांना बसत आहे. तसेच देवाची तुळशी पूजा बंद करावी, अशी मागणी देखील वारकरी संप्रदायाने केली आहे.

सावळ्या विठुरायाचे दर्शनाची आस भाविकांना नेहमीच आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ऑनलाईन दर्शन बुकिंगची सोय उपलब्ध करून दिली. आता या पुढे जाऊन टोकन दर्शन प्रणाली सुरू करणार आहे. त्याचा एक भाग म्हणजे आता ऑनलाईन बुकिंगच्या संख्येत वाढ केली आहे. सण, यात्रा, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून स. ७ ते रात्री ९ या वेळेत एकूण सहा स्लॉट निश्चित करून, प्रति स्लॉट ६०० प्रमाणे दैनंदिन ३ हजार ६०० बुकिंग उपलब्ध असणार आहेत. याशिवाय, जास्तीत जास्त दहा दिवस अगोदर बुकिंग करता येणार असून, पासेस शिल्लक राहिल्यास त्याच दिवशी बुकिंग करता येईल. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत https://www.vitthalrukminimandir.org” या संकेतस्थळावरील मुख्य पृष्ठावर “Pass Booking” या लिंकवर क्लिक करून माहिती भरायची. त्या नंतर पास डाउनलोड करून बुकिंग तारखेच्या दिवशी मंदिर परिसरातील श्री संत तुकाराम भवन येथे १५ मिनिटे अगोदर भेट द्या व आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) दाखवा आणि पासची तपासणी करून, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश करावा. सदरची सुविधा निशुल्क असून, यासाठी कोणत्याही प्रकारची मंदिर समिती फी आकारणार नाही, अशी माहिती व्यवस्थापक श्रोत्री यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही सेवा सुरू होऊन दोन दिवस झाले. मात्र, याचा फटका दर्शन रांगेतील भाविकांना बसत आहे. देवाच्या तुळशी पूजेमुळे दर्शन थांबवले जाते. त्यामुळे रांगेतील भाविकांना थांबावे लागत आहे. मंदिर समितीने उत्पन्न वाढीसाठी दुसरे उपाय करावेत. दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत ठेवू नये. ही पूजा बंद करावी, वास्तविक पाहता मंदिर समितीने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. या बाबत मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे वारकरी संघाचे ह.भ.प. वीर महाराज यांनी सांगितले.