माओच्या क्रांतीकारी विचाराने भारावलेल्या नक्षलवाद्यांचे या देशावर लाल झेंडा फडकावण्याचे स्वप्न महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वावर आधारित शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने भंग केले आहे. गडचिरोलीत आत्मसमर्पण योजनेला मोठे यश मिळाले असून अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या ९३ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची स्वतंत्र वसाहत ‘नवजीवन नगर’ आकाराला येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वसाहतीचे भूमिपूजन होणार आहे. विशेष म्हणजे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत देशात प्रथमच निर्माण होत आहे.
गडचिरोली जिल्हय़ात नक्षल चळवळीत अतिशय आक्रमक पध्दतीने काम करीत असतांना गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने आत्मसमर्पण योजनेचा शस्त्र म्हणून अतिशय प्रभावीपणे वापर करताना ही चळवळ काही अंशी संपुष्टात आणली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्हय़ातील नक्षलवादी मोठय़ा संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. २६ ऑगस्ट २०१४ पासून तर आजपर्यंत म्हणजे गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यातील ९३ नक्षलवाद्यांची गडचिरोलीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वतंत्र वसाहत ‘नवजीवन नगर’ या नावाने आकाराला येत आहे. या ९३ नक्षलवाद्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या विविध दलमचे पाच कमांडर आहेत. तर १५ उपकमांडर व उर्वरित चळवळीत सक्रिय सदस्य आहेत. या सर्वाना या वसाहतीत भूखंड देण्यात आले आहेत. कालांतराने त्यावर शासकीय निधीतून घरकुल बांधून देण्याची योजना असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत देशात प्रथमच गडचिरोलीत आकाराला येत आहे. याचे संपूर्ण श्रेय गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना आहे. त्यांनीच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना रोजगारासोबतच घर उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार सर्वप्रथम नक्षलवाद्यांना भूखंड उपलब्ध करून देण्यात येत आहे.छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांत सुध्दा आत्मसमर्पण योजना राबविली जाते. मात्र, तिथे नक्षलवाद्यांना घरकुल बांधून देण्याचा अशाप्रकारचा प्रयोग झाल्याचे ऐकिवात नाही. मागील दीड वर्षांच्या काळात पोलिसांनी गडचिरोली जिल्हय़ात राबविलेली नक्षल विरोधी अभियाने, झालेल्या चकमकी यामुळे नक्षलवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आत्मसमर्पणाचा पर्याय हा नक्षलवाद्यांसाठी नवजीवन सुरू करण्याचा मार्ग ठरत आहे. पोलिसांनी या कालावधीत नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांशी केलेला संवाद, त्यांच्या समस्या जाणून सोडविण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून केलेली जागृती यातून सर्वसामान्यांपासून नक्षल्यांपर्यंत चळवळीचा फोलपणा लक्षात आला आहे. गडचिरोलीत अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करून सुखी जीवन जगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज भूखंडांचे हस्तांतरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्व आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भूखंडांचे २५ फेब्रुवाराला हस्तांतरण केले जाणार आहे. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, अर्थ, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित राहणार आहेत. या नव्या उपक्रमामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे भविष्य उजळून निघणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent estates of surrendered naxals in gadchiroli
First published on: 25-02-2016 at 02:14 IST