India Pakistan Tension भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात शस्त्रविराम झाला असला तरीही जवळपास सगळ्याच सैनिकांना सुट्टीवरुन परत बोलवण्यात येत आहेत. महाराष्ट्रातल्या अमरावती येथील अचलपूरच्या जवान रेश्मा इंगळे यांनाही सुट्टी रद्द करुन अमृतसरला बोलवण्यात आलं आहे. त्या एक वर्षाच्या त्यांच्या मुलाला घरी ठेवून सीमेवर गेल्या आहेत. मुलाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. मात्र त्यांच्या या निर्णयाचं त्यांच्या कुटुंबाने आणि अचलपूरच्या लोकांनी कौतुक केलं आहे. त्यांचे पती भारत इंगळे यांनी आपण आता नोकरी सोडणार असून मुलाचा सांभाळ करु असं सांगितलं आहे.
रेश्मा इंगळे काय म्हणाल्या?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला फोन आले आहेत की तुमची सुट्टी रद्द कऱण्यात आली आहे आणि तुम्हाला परत यायचं आहे. बाळाला बरोबर नेणं शक्य नाही, कारण तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मी एक वर्षाच्या मुलाला ठेवून निघाले आहे. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये रेश्मा इंगळे कार्यरत आहेत.
१२ वर्षांपासून बीएसएफमध्ये कार्यरत आहेत रेश्मा इंगळे
रेश्मा इंगळे म्हणाल्या की मी BSF मध्ये १२ वर्षांपासून आहे. आधी मी भुज आणि कच्छला होते. आता अमृतसर या ठिकाणी माझं पोस्टिंग आहे. माझं बाळ एक वर्षाचं आहे. तिथली परिस्थिती पाहता बाळाला नेता येणार नाही. त्यामुळे मी त्याला सोडून कर्तव्यावर जाते आहे. शस्त्रविराम झाला असूनही पाकिस्तानकडून काही कुरापती सुरु आहेत. त्यामुळे आम्हाला सुट्टी रद्द करुन बोलवलं आहे. पाकिस्तान जे करतो आहे त्यांना उत्तर देणं आवश्यक आहे. बाळाला घरी सोडून जाताना मला वाईट होतं आहे. पण परिस्थितीच तशी आली आहे. आम्ही सगळ्या सैनिकांनी जो गणवेश घालतो त्यासाठीचं कर्तव्य बजावण्याची वेळ हीच आहे. मला वाईट वाटतं आहे ते बाळासाठी पण माझ्या देशासाठी मी चालले आहे याचा अभिमानही आहे असंही रेश्मा इंगळे यांनी सांगितलं.
रेश्मा इंगळे यांचे पती भारत काय म्हणाले?
“माझ्या पत्नीला मला प्रचंड अभिमान आहे. मी माझी नोकरी सोडून आता बाळाला सांभाळण्यासाठी थांबतो आहे. आम्हाला रेश्माचा अभिमान आहे कारण ती देशसेवेसाठी जाते आहे.” असं रेश्मा यांचे पती भारत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी त्यांनी हा संवाद साधला. अमरावती येथील अचलपूर या ठिकाणी रेश्मा इंगळे राहतात. त्यांना त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला घरी ठेवून अमृतसरला जावं लागलं आहे.