जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी जैन व्हॅली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी कृषिमंत्री शरद पवार, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
पोलिसांच्या पथकाने मानवंदना देऊन बंदुकीच्या फैरी हवेत झाडल्या. माजी कृषिमंत्री पवार यांनी, कोणत्याही संकटावर मात करून त्यातून मार्ग कसा काढावा, त्या अनुषंगाने वर्तन कसे असावे, याचा आदर्श म्हणजे भंवरलाल जैन असल्याचे नमूद केले. देशावर, शेतीवर प्रेम करणाऱ्या जैन यांनी शेतीचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले. विविध संशोधनातून पाण्याचा संचय, कृषी उत्पादकता वाढ, कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग या माध्यमातून बळीराजाचा विकास करण्याचे काम त्यांनी केले. कल्पकता, संशोधन, हे त्यांचे स्वभावगुण आपल्याला ज्ञात आहेत. अस्वस्थ होऊन अश्रू ढाळले तर त्यांना समाधान मिळणार नाही. या संकटावर मात करत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. भारत महासत्ता होईल आणि त्याचा लाभ बळीराजाला मिळेल, असा विचार त्यांनी मांडला होता. त्यांचे संस्कार आणि विचार पुढे नेण्यासाठी सर्वाना शक्ती मिळो, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. महसूलमंत्री खडसे यांनी क्रांती घडविणारा जलपुरूष असा त्यांचा उल्लेख केला. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे, निसर्ग कवी ना. धो. महानोर यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.