अमरावती : गेल्या सहा दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील एक तरुणी बेपत्ता झाली होती. या तरुणीला शहरातीलच एका तरुणाने पळवून नेले, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या प्रकारामुळे आमची बदनामी झाली आहे, तसेच माझ्या मुलाला धमकी दिल्यामुळे तो भयभीत झाला आहे, अशी तक्रार त्या मुलाच्या वडिलांनी राजापेठ पोलिसांत दिली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी खासदार राणा यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली आहे.

रुक्मिणीनगर भागातील तरुणी गेल्या ५ सप्टेंबरला दुपारपासून घरून बेपत्ता झाली होती. दरम्यान, या प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि  नवनीत राणा यांनी ६ सप्टेंबरला राजापेठ पोलीस ठाणे गाठले होते. बेपत्ता असलेल्या तरुणीला शहरातीलच एका दुसऱ्या धर्माच्या मुलाने पळवून नेले आहे, त्याला सर्व माहीत आहे, मात्र तो पोलिसांना माहिती देत नाही, पोलीस त्याच्याकडून मुलीची माहिती काढण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करून खा. राणा यांनी पोलिसांवर तोंडसुख घेतले होते. तसेच राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी आपले संभाषण धनिमुद्रित केले, असा आरोप राणा यांनी केला होता.