Indurikar Maharaj Kirtan video: महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र समारंभात केलेल्या खर्चावरून अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले. या ट्रोलिंगनंतर वैतागलेल्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून ट्रोलर्सचा समाचार घेतला. तसेच दोन-चार दिवसांत यापुढे कीर्तन करायचे की नाही? याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या नव्या किर्तनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी महाराज त्यांच्या नेहमीच्या शैलीत ट्रोलर्सना फैलावर घेतात. तसेच ३१ वर्षांपासून महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले, तरीही मी लोकांच्या शिव्या खात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मी निर्लज्ज म्हणून जिवंत
इंदुरीकर महाराज म्हणाले, “माझ्या इतकी कीर्तने कुणी केली नाहीत. माझ्या इतका त्रासही संप्रदायात कुणी काढला नाही, दुसरा असता तर मेलाच असता. मी निर्लज्ज म्हणून जिवंत आहे. माझ्या मागे रोज नवे लफडे आहे. लोक आता रोज मला शिव्या द्यायला लागले आहेत. त्यामुळे मला आता थांबायची गरज निर्माण झाली आहे. दोन-चार दिवसांत मी निर्णय घेणार आहे.”
३० वर्षांत ३० गाड्या बदलल्या
“मी ३१ वर्ष कीर्तन करत आहे. त्यासाठी राज्यभर फिरतो. आजवर माझ्या २६ स्कॉर्पिओ झाल्या आणि तीन बोलेरो झाल्या. तीस वर्षात तीस गाड्या बदलून झाल्या. आताही मी रोज तीन कीर्तन करतो. महिन्याला ८० ते ८२ कीर्तने होतात. मी किती कष्ट केले, याचा विचार लोक करत नाहीत”, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.
कीर्तन करत असताना मी संसाराकडे कधी बघितले नाही. आठ-आठ दिवस माझ्या मुलांची गाठ व्हायची नाही. लोक आमच्या कष्टाचा विचार करत नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
मुलीच्या कपड्यावरून कशाला बोलता?
“माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत? याच्यावर लोकांच्या कमेंट्स आहेत. यापेक्षा अजून काय वाईट पाहायचे. माझ्या मुलीच्या अंगावर कपडे कसे आहेत? त्यावर चार दिवस बातम्या सुरू आहेत. तुम्ही मला बोल लावा, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे? या कॅमेरे वाल्यांनी चार दिवसात माझे जगणे मुश्कील करून टाकले आहे”, अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली.
मी तीस वर्षांत लोकांच्या शिव्याच खातोय. ३० वर्षांच्या मेहनतीचे फळ माझ्यापर्यंत ठिक होते, पण ते माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचायला नको, असेही ते म्हणाले.
