विदर्भातील जुन्या पिढीतील शिक्षण महर्षीची दिवं. प्राचार्य श्रीकृष्ण दत्तात्रय उपाख्य बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुध्द विद्यालय न्यास या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या दोन गटांमधील आरोप-प्रत्यारोपांचा वाद चव्हाटय़ावर आला असून सत्तेबाहेर असलेल्या उल्हास दाते, अ.वि. जोशी, सतीश फाटक, वसंतराव फडणवीस यांनी सत्तेत असलेल्या विशुध्द विद्यालयाचे सचिव सुरेश शिंदे पाटील यांच्यावर ते अवैधपणे संस्था चालवित असल्याचा आणि अनियमितता करीत असल्याचा आरोप केला आहे.
उल्हास दाते यांनी येथे वार्ताहर परिषदेत आपण संस्थेचे उपाध्यक्ष असल्याचा, तर सतीश फाटक हे सहसचिव असल्याचा दावा केला आहे. उल्हास दाते यांनी सांगितले की, विशुध्द विद्यालय संस्थेतून निर्माण झालेल्या वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचा कारभार अध्यक्ष म्हणून सुरेश िशदे पाहत आहेत.
वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट व्दारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात देखील अनेक प्रकारच्या अनियमितता असून त्यासंबंधी आपण अमरावती विद्यापीठ, धर्मदाय आयुक्त आणि विद्यापीठ अनुदान मंडळ इत्यादी योग्य प्राधिकरणांकडे तक्रारी केल्या आहेत.
उल्हास दाते, अ.वि.जोशी, वसंतराव फडणीस आदीनी केलेले सर्व आरोप निराधार बिनबुडाचे व सत्याचा विपर्यास करणारे असल्याचे स्पष्टीकरण विशुध्द विद्यालय संस्थेचे सचिव सुरेश शिंदे पाटील यांनी केले आहे.
विशुध्द विद्यालय संस्थेच्या अध्यक्षपदी उषाताई पाटणकर यांची रितसर निवड झाली आहे. या पदावर उल्हास दाते यांना अध्यक्ष होता आले नाही म्हणून त्यांनी संस्थेवर राग काढून बदनामी चालविली असल्याचा प्रत्यारोप सुरेश शिंदे पाटील यांनी केला आहे. वाणिज्य महाविद्यालयातील काही प्राध्यापक देखील संस्थेला बदनाम करण्याच्या मोहिमेत सहभागी असून योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्या जाईल, असा इशाराही िशदे पाटील यांनी दिला आहे.
विशुध्द विद्यालय संस्था आणि वाणिज्य महाविद्यालय न्यास या दोन्ही शैक्षणिक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांबाबतचा वाद सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे प्रलंबित असतांना संस्थेवर आरोप करून बदनामी करणे उचित नाही. उल्हास दाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालविलेल्या बदनामीविरोधात आपण मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही िशदे यांनी सांगितले.