अपुरा पाऊस, नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात आणि देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारकडून कर्जमाफी, पीक विमा आदी योजनांद्वारे बळीराजाला या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुसरीकडे मात्र आत्महत्या काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कर्ते पुरूष कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. पण इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर ही रडगाणी न गाता..अवघ्या काही गुंठ्यात..आदर्श आणि यशस्वी शेती कशी करता येते याचा वस्तूपाठच एका माऊलीने उभा केला आहे. मनीषाताई भांगे असे या माऊलीचे नाव असून त्यांनी खैरेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती कशी करावी याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. अशिक्षीत असूनही एखाद्या कृषी तज्ज्ञाला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. हाती तीन एकर माळरान, पाण्याची कमतरता अशा परिस्थितीलाही न डगमगता यशस्वी शेती करत त्यांनी शेतीपूरक उद्योगही उभा केला. अवघ्या ३ गुंठा शेतीत ५२ पिके घेण्याची किमया त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी सेंद्रिय शेती करून पर्यावरणाची हानीही टाळली. निरोगी समाज निर्मितीस सहकार्य म्हणून सुमारे १० हजार कुटुंबांना त्यांनी मोफत शेवगा बी आणि रोपांचे वाटप केलं आहे. आधुनिकतेबरोबर पारंपारिक शेतीचा स्वीकार त्यांनी केला. ३ गुंठा आणि ३ एकर शेतीचे मॉडेल कृषी जगतासमोर आणले आहे. आज त्यांची ही कामगिरी पाहण्यासाठी राज्यातून, देशातून विविध संस्था, व्यक्ती आवर्जून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोटासाठी गाव सोडलं..

साधारणपणे १९८० च्या सुमारास प्रतिकूल परिस्थितीमुळे मनीषाताईंनी पती भागवत यांच्यासह एक मुलगा आणि मुलीला घेऊन गाव सोडलं आणि रोजीरोटीसाठी पुणे गाठलं. पुण्यासारख्या मोठ्या शहरात तगण्यासाठी पती भागवत मोलमजुरी करू लागले. पतीला हातभार लागावा म्हणून मनीषाताईंनी घरोघरी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. कालांतराने पुण्यात राहणे जिकिरीचे झाल्यामुळे त्यांनी परत आपल्या गावाचा रस्ता धरला आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती. शेतातल्या विहिरीत फक्त पावसाळ्यातच पाणी असे.. इतरवेळी पिण्याच्या पाण्याची ओरड तिथे शेती कशी करायची हा त्यांच्यासमोरील यक्ष प्रश्न. यावर उपाय म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी शेतात कूपनलिका घेतली. याचदरम्यान पतीचे निधन झाले. एका संकटातून बाहेर निघतोय असे वाटत असतानाच त्यांच्यावर हा दुसरा आघात झाला. परंतु, अशाप्रसंगीही त्यांनी न खचता लढाऊ वृत्ती दाखवत यावर मात केली. शेती करत असतानाच सर्वांत प्रथम दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा सुरू केला. शेळी पालन केले. यातूनच त्यांना नवे मार्ग मिळत गेले. कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलत त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिलं. मुलगा गुरूनाथला बीएसस्सी, एमएसडब्ल्यूपर्यंत शिकवलं. तो आता चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असून आपल्या आईच्या शेतीच्या प्रयोगात त्यानं स्वत:लाही वाहून घेतलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International womens day 2018 lady farmer manisha bhange success story organic farm 3 guntha farm model in madha khairewadi
First published on: 08-03-2018 at 10:03 IST