आयपीएलच्या अंतिम सामन्यात सट्टेबाजी करणाऱया सात सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. या पैकी सहा सट्टेबाजांना मुंबईतून तर एका सट्टेबाजाला औरंगाबादमध्ये पोलिसांनी अटक केली. संजय ठक्कर असे औरंगाबादमधील सट्टेबाजाचे नाव आहे. त्याला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली.
मुळचा सोलापूरमधील राहणारा असलेला ठक्कर याला औरंगाबादेतील हॉटेल रॉयल पार्कमधून पोलिसांनी अटक केली. या हॉटेलमधील रुम क्रमांक २०५ मधून ठक्कर याने रविवारी झालेल्या सामन्यावर सट्टेबाजी केली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल, १५२०० रुपयांची रोकड, आयपीएल सामन्यांच्या डायऱया आणि आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली आहेत. सोलापूरमध्येही तो सट्टेबाजीचा व्यवसाय करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठक्कर यांच्याकडे कोणी कोणी सट्टेबाजी केली, याचा शोध आता पोलिस मोबाईल क्रमांकावरून घेत आहेत. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्समध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला. या सामन्यात सट्टेबाजी करण्यासाठी ठक्कर हा २४ तारखेपासून औरंगाबादमध्ये होता. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव तपास करीत आहेत.
देवनारमधून सहा सट्टेबाज अटकेत
देवनार पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये देवनारमधील छेला मार्केट परिसरातून चार सट्टेबाजांना तर घाटकोपरमधून दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रविवारी रात्री या सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून आठ मोबाईल, चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आले आहे. या सट्टेबाजांच्या मोबाईल कॉल्सचा तपास पोलिस करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2013 रोजी प्रकाशित
मुंबई, औरंगाबादमधून सात सट्टेबाजांना अटक
आयपीएलच्या अंतिम सामन्यात सट्टेबाजी करणाऱया सात सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. या पैकी सहा सट्टेबाजांना मुंबईतून तर एका सट्टेबाजाला औरंगाबादमध्ये पोलिसांनी अटक केली.
First published on: 27-05-2013 at 11:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl betting seven bookies arrested by mumbai and aurangabad police