आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या पाच सट्टेबाजांना गुन्हे अन्वेषण विभागाने नाशिक रोड भागातून अटक केली. ठाणे, नाशिक, शिर्डी व बुलढाणा या भागात भ्रमंती करत ही मंडळी नोंदणी करीत होती. बुधवारी झालेल्या हैदराबाद व राजस्थान या संघांदरम्यानच्या सामन्यावर संबंधितांनी मोठय़ा प्रमाणात सट्टा लावल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी न्यायालयाने या सर्व संशयितांची २७ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. यातील चार संशयित बुलढाण्याचे आहेत.
मुंबईपाठोपाठ राज्यातील इतर भागांतही आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला जात असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. महिन्याभरापासून गुन्हे अन्वेषण विभाग या सट्टेबाजांच्या मागावर होता. परंतु, काही दिवसांपूर्वी श्रीशांतचे प्रकरण उघड झाल्यावर हे सट्टेबाज आपल्या मूळ गावी म्हणजे बुलढाण्याला निघून गेले होते. नंतर पुन्हा नाशिकला येऊन त्यांनी नोंदणी सुरू केली आणि ते अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांचा काही बडय़ा सट्टेबाजांशी संबंध असल्याचा पोलिसांचा कयास आहे. नाशिक रोड परिसरातील दुर्गा उद्यानासमोरील राजेंद्र देवेंद्र सावाना यांच्या घरात राजस्थान रॉयल विरुद्ध सनराईज हैदराबाद सामन्यात थेट प्रक्षेपण पाहून काही जण सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री दहाच्या सुमारास साई पॅलेस बंगल्यावर छापा टाकला असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्रवीण गोपालदास भुतडा, पंकज विनोद सोमाणी, समीर महेंद्र मंत्री, रवी नामदेवराव ढगे (सर्व रा. बुलढाणा), राजेंद्र देवेंद्र सावना (नाशिक रोड) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० भ्रमणध्वनी, ३ लॅपटॉप, दूरचित्रवाणी संच, सेटटॉप बॉक्स, पेन ड्राईव्ह असे एकूण एक लाख सहा हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिली.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे, नाशिक, शिर्डी व बुलढाणा आदी भागात भ्रमंती करत हे संशयित नोंदणी करत होते. पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी संबंधितांनी हा मार्ग अवलंबिल्याचे सांगण्यात आले. संबंधितांकडे मिळालेल्या लॅपटॉप व भ्रमणध्वनीच्या माध्यमातून या प्रकारात कोण कोण गुंतले आहे, त्याचा छडा लावण्याचे काम यंत्रणेने हाती घेतले आहे. संशयितांना गुरुवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.