IPS Officer Anjana Krishna Ajit Pawar Phone Call Controversy: करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. अजित पवार हे करड्या शिस्तीचे आणि प्रशासनावर जरब असणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेक अधिकारी त्यांच्याशी बोलताना दचकून असतात, असे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. पण प्रशासनात नवख्या असलेल्या अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ज्या प्रकारे उत्तर दिले, त्यानंतर त्या चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या.
देशभरात अंजना कृष्णा यांची चर्चा झाली. ही चर्चा त्यांच्या गावी म्हणजेच केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथेही पोहोचली. त्यानंतर त्यांचे वडील व्ही आर राजू यांनी आपल्या मुलीच्या खडतर प्रवासाची आणि तिच्या प्रामाणिक, पारदर्शक आणि खमक्या स्वभावाची माहिती दिली.
तिरुअनंतपुरम जिल्ह्याच्या विलावूरकल या पंचायतीमधून आयपीएस होणाऱ्या अंजना कृष्णा या पहिल्याच आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना व्ही आर राजू म्हणाले की, अवैध उत्खनन हा विषय माझ्या मुलीसाठी नवीन नाही. आमच्या घरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या मुक्कुन्नीमाला येथे ती लहानपणापासून अवैध खाणकाम पाहत मोठी झाली आहे.
व्ही आर राजू पुढे म्हणाले, यावर्षी डिसेंबर महिन्यात अंजना २८ वर्षांची होईल. तिला लहानपणापासूनच आयपीएस व्हायचे होते. मला मात्र तिने डॉक्टर व्हावे, असे वाटत होते. पण जेव्हा महाविद्यालयात असताना तिने तिचा स्पष्ट विचार बोलून दाखवला, तेव्हा आम्ही तिच्या मागे उभे राहिलो.

पहिल्या तीन प्रयत्नांत अपयश
एनएसएस महाविद्यालयातून गणितात पदवी घेतल्यानंतर अंजनाने केरळमध्येच यूपीएससीचे कोचिंग सुरू केले. पहिल्या तीन प्रयत्नांत अंजनाला अपयश आले. त्यानंतर २०२२ साली दिलेल्या चौथ्या प्रयत्नात ती देशभरातून ३५५ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली, अशी माहिती राजू यांनी दिली.
व्ही आर राजू पुढे म्हणाले, तीन वेळा अपयश आल्यानंतर कुणीही नाउमेद होऊ शकतो. पण अंजनाचा आत्मविश्वास कधीही ढळला नाही. या काळात तिच्या कोचिंगवर होणाऱ्या खर्चाबाबत आम्ही कधीही प्रश्न उपस्थित केला नाही. पण तिसऱ्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर मी तिला इतर शासकीय पोस्टच्या परीक्षा देण्याचा आग्रह केला. त्यानंतर तिने रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाची परीक्षा दिली.
रेल्वेत क्लर्कची नोकरी लागली
राजू यांनी पुढे सांगितले की, रेल्वे बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर तिची क्लर्क म्हणून निवड झाली. मुलाखतीनंतर रेल्वेत सामील होण्यासाठी तिने सहा महिन्यांचा वेळ मागितला होता. दरम्यान यूपीएससीच्या चौथ्या प्रयत्नात ती उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. यानंतर तिने आयपीएस होण्यास पहिली पसंती दिली.

आयपीएस झाल्यानंतर अंजनाने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून क्रिमिनोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली. तसेच यूपीएससी करत असताना मल्याळममधील एका दैनिकात सहा महिने कामही केले.