अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील हिंदू समाजाच्या तरुणाने मुस्लीम तरुणीशी लग्न केल्यानंतर, तो मुलगा बेपत्ता झालेला आहे. तर, तरुणीच्या कुटुंबीयानीच संबंधित तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस देखील तरुणाचा शोध घेत आहेत. मात्र अद्यापही त्याचा काही पत्ता लागलेला नाही. यामुळे तरुणाचे कुटुंबीय अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात आज(शनिवार) श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तरुणाचे कुटुंबीय, माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार नितेश राणेंनी आक्रमक भूमिका मांडली.
नितेश राणे म्हणाले, “संबंधित तरूणाने एक मुस्लीम मुलीशी लग्न केल्याने, त्या मुलीकडच्या लोकांना हे आवडलं नाही. मग त्यानंतर त्यांनी रागापोटी द्वेषापोटी त्याचं अपहरण केलं. आज त्याचं नेमकं काय झालं, तो जिवंत आहे मेला आहे. याबाबत पोलीसही काही सांगत नाहीत आणि त्याच्या कुटुंबालाही काही माहीत नाही. आमच्या आक्रोश मोर्चात त्याचे वडील आमच्याबरोबर होते. प्रत्येक पाच मिनिटांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. मला एवढंच म्हणत होते की माझा मुलगा फक्त माझ्यापर्यंत आणून द्या. त्याचे इतर कुटुंबीय देखील आम्हाला भेटले. ते देखील पोलिसांकडे उत्तर मागत आहेत. त्यांना विचारायचं आहे की, माझ्या मुलाची नेमकी चूक काय आहे?, त्याने एका मुस्लीम मुलीशी लग्न केलं ही त्याची चूक झाली का?”
याचबरोबर, “ मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आमच्या हिंदू मुलींशी लग्न केलं जातं किंवा विविध प्रकार त्यांच्यसोबत घडतात. मग त्यावर आम्ही अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली तर चालेल का? आमच्या एका मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केलं तर त्याचं अपहरण झालं आणि त्याचा पत्ता लागत नाही. मग असंख्य अशा घटना ज्या तुमच्या अहमदनगरमध्ये आणि महाराष्ट्रात घडतात. जिथे आमच्या हिंदू मुलींना विकण्याचं, वैश्या व्यवसायास लावण्याचं, त्यांना गायब करण्याचं आणि त्यांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम होतं. मग तेव्हा हिंदू समाज म्हणून आम्ही नेमकं काय करायचं? आम्ही असंच वागायचं का? सगळं सहन करण्याचा ठेका हा फक्त हिंदू समाजानेच घेतला आहे का?” असादेखील सवाल यावेळी नितेश राणेंनी उपस्थित केला.
धर्मांतराच्या सर्वाधिक घटना नगर जिल्ह्यात –
“ आमच्या मुलींना तुम्ही काही करा, पण तुमच्या समाजाच्या मुलीसोबत असं घडलं तर कशा भावना दुखतात. हे आज तिच्या घरच्यांना समलं असेल. मग जेव्हा असंख्य हिंदू मुलींबरोबर या गोष्टी घडतात, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या मनाला काय वाटलं असेल? हा प्रश्न या निमित्त मला मुस्लीम धर्मातील ज्येष्ठांना आणि जबाबदार व्यक्तींना विचारायचा आहे. कुठेतरी मुस्लीम धर्मात जे ज्येष्ठ, अभ्यासू लोक आहेत, जे त्यांना विचार देतात त्यांनी याबाबत कुठंतरी हस्तक्षेप केला पाहिजे. की नेमकं आपण आपल्या धर्माला कुठं घेऊन जात आहोत. आज असंख्य गोष्टींसाठी नगरचं नावलौकीक आहे. परंतु या ज्या गोष्टी अहमदनगरमध्ये सुरू आहेत, त्यामुळे जिल्हा बदनाम होतोय. सर्वात जास्त धर्मांतराच्या ज्या घटना घडत आहेत, त्या नगर जिल्ह्यातच घडत आहेत.” असंही आमदार नितेश राणे यांनी यावेळी बोलून दाखवलं.