पंढरपूर : पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांचा राजीनामा मागणे योग्य नाही, असे म्हणत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण केली. अजित पवारांनी त्याच वेळी ही प्रकरण थांबवले असते, तर इथपर्यंत वेळ आली नसती. मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी आदेश दिला आहे. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्यावर बोलता येईल. विरोधकांना दुसरा मुद्दा नाही. त्यामुळे ते राजीनाम्याचा मुद्दा पुढे करत आहेत, असेही विखे पाटील म्हणाले.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माळशिरस तालुक्यातील पाणीव येथे आले होते. त्या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे कोविड काळात जनतेला गरज असताना घरात बसून राहिले. करोना लसीसाठी ठेवलेले सहा हजार कोटी रुपये गेले कुठे? शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे हे उद्धव ठाकरे यांचे बेगडी रूप आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कंपनीच्या नौटंकी सुरू आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

तर मनोज जरांगे यांच्याबद्दल प्रकार गंभीर आहे. त्यांनी दिलेले पुरावे, ऑडिओ क्लिप गंभीर आहे. खरेच धनंजय मुंडे दोषी असतील, तर त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. जरांगे धमकीप्रकरण पाहिले, तर राजकारणातील वैचारिक पातळी घसरू लागली आहे. सगळ्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर आणल्या जात आहे. सुपारी देऊन मारण्यापर्यंत गोष्टी जातात. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असेही ते म्हणाले.

पंढरपुरात लक्ष्मण हाके आणि मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याबाबत विचारले असता, विखे पाटील यांनी हाकेंवर बोचरी टीका करत सल्ला दिला, की त्यांनी आपले जनतेतील स्थान काय आहे याची तपासणी करावी. लोकसभेला त्यांना चार हजारसुद्धा मते पडली नाहीत. त्यांच्या वक्तव्याने सामाजिक दुही निर्माण होत आहे. वास्तविक पाहता त्यांनी लोकांची कामे केली पाहिजेत. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणावरही टीका करण्यापेक्षा हाके यांनी लोकांची कामे करावीत.