आज छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी अमित शाह यांनी घणाघाती भाषण करत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका केली. आता आपल्याला या लोकांना घरी बसवायची वेळ आली आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्याला निजामापासून मुक्त केलं होतं. आता या नव्या निजामांना घरी बसवायची आणि त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे असं अमित शाह म्हणाले आहेत. तसंच यावेळी ४० ते ४१ जागा नकोत तर ४५ पेक्षा जास्त जागा मोदींसाठी द्या असंही आवाहन अमित शाह यांनी म्हटलं आहे.
दहा वर्षांत आम्ही उत्तम काम केलं आहे
आम्ही दहा वर्षात उत्तम काम केलं आहे, आमच्याकडे त्याचा हिशेब आहे. तसंच आमच्याकडे पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप आहे असंही अमित शाह छत्रपती संभाजी नगर येथील भाषणात म्हणाले. मी या मंचावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, इंडि आघाडीचं नेतृत्व तुम्ही करत आहात, २००४ ते २०१४ सोनिया गांधींच्या नेतृत्वातलं मनमोहन सरकार होतं. तेव्हा महाराष्ट्राला किती निधी मिळाला? १ लाख ९१ हजार कोटी. मात्र मोदी सरकारच्या मागच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात चौपट निधी म्हणजेच ७ लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला दिला. १६ लाख कोटी मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी पाठवले. मला शरद पवारांना विचारायचं तर हिशेब घेऊन या, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलंत?
महाराष्ट्रासाठी युपीएच्या कारकिर्दीपेक्षा चौपट निधी मोदी सरकारने दिला
१ कोटी २० लाख लोकांना महाराष्ट्रात प्यायचं पाणी घरात मिळालं. ७६ लाख कुटुंबांना घरात शौचालय मिळालं. ५१ लाख लाभार्थ्यांना घरात गॅस मिळाला. १२ लाख लाभार्थ्यांना घरं मिळाली हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. विविध प्रकारच्या सुविधा मागच्या दहा वर्षांत दिल्या आहेत.
हे पण वाचा- “राहुलयान १९ वेळा फेल झाल्यामुळे…”, अमित शाहांचा राहुल आणि सोनिया गांधींवर हल्लाबोल
३७० अनौरस मुलाप्रमाणे काँग्रेसने सांभाळलं
माझं इंडि आघाडीला आव्हान आहे.. तुमची दहा वर्षे आणि आमची दहा वर्षे करा हिशेब. बघा कुणाचं पारडं जड आहे? मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा सफाया केला. कलम ३७० हटवणं हा योग्य निर्णय घेतला. ७० वर्षे कलम ३७० अनौरस मुलाप्रमाणे काँग्रेसने कुरवाळलं होतं. मात्र मोदी २.० च्या काळात त्यांनी हे कलम ३७० हटवलं. मला राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते कलम ३७० हटवलं तर काश्मीरध्ये रक्ताचे पाट वाहतील. पण पाच वर्षात कुणाला दगड उचलण्याचीही हिंमत झालेली नाही. असंही अमित शाह म्हणाले.