महागाईला आळा घाला, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, दोन रुपये दरमहा ३५ किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला द्या, यांसह इतर अनेक मागण्यांसाठी मालेगाव येथे सोमवारी आयटकच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
एटीडी उर्दू हायस्कूलपासून दुपारी साडेबारा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चात घरकामगार, मोलकरणी, आशा, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, स्त्री परिचर, रोहयो मजूर आदी सहभागी होणार आहेत. घरकामगार मोलकरीण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, विविध कार्यकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सेवानियम लागू करा, नाशिक जिल्ह्य़ाचा दारिद्रय़रेषेचा सव्‍‌र्हे त्वरित जाहीर करावा, आदी मागण्याही आयटकच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मोर्चाचे नेतृत्व राज्य सचिव कॉ. राजू देसले, जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. दत्ता निकम, उपाध्यक्ष संगीता उदमले हे करणार आहेत.