राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री असणाऱ्या विनोद तावडे यांचे नाव भाजपाच्या उमेदवारांच्या यादीमध्ये न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. शिवाय तावडेंबरोबरच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर तावडे यांनी पत्रकारपरिषदेद्वारे आपली भूमिका व्यक्त करताना म्हटले आहे की, मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिले? याचे मी आत्मपरीक्षण करत आहे. मला असे वाटते की, पक्षही याचा विचार करेल. पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही याबाबत विचार करेल. पण आज निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचे चुकले कोणाचे बरोबर आहे, याचा विचार करण्याचा वेळ नाही.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वंयसेवक आहे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आम्ही राजकारणामध्येही स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणून काम करतो. हे करत असताना खरा उद्देश आणि लक्ष्य आहे ते राष्ट्र निर्माणाचं. समाज कल्याणाचे. आमदारकी असेल, विरोधी पक्ष नेता असेल, पक्षाचा अध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल किंवा मंत्री असेल, ही मधली स्टेशन्स् आहेत. आपल्याला यातून समाजहित करायचं आहे. तळागळातल्या माणसांसाठी काम करायचं आहे. तिकीट का नाही मिळाले याची चर्चा निवडणुकीनंतर मी पक्ष श्रेष्ठींबरोबर आवर्जुन करेन. जर, माझे काही चुकले असेल तर दुरुस्त करेन. कारण, माझ्याविषयी काही चुकीच्या माहितीपोटी निर्णय झाला असेल तर तो पण दुरुस्त करेन.
या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने भारतीय जनता पक्ष आणि महायुती जिंकली पाहिजे, यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. आपल्या सगळयांना शिकवलंय की, ‘नेशन फर्स्ट, पार्टी नेक्सट, सेल्फ लास्ट’. त्यामुळे तावडे पवारांना भेटले का? तावडे अपक्ष उभे राहणार का? असे काही विचारही माझ्या मनाला शिवत नाही आणि मला असे कोणी विचारूही शिकत नाही. की तुम्ही आमच्या पक्षात येता का? कारण, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपशी असे काही एकनिष्ठ आहोत की, त्यामुळे लोकांना हे सर्व माहिती आहे.
मला या निवडणुकीमध्ये तिकीट मिळाले नाही म्हणून अनेकांचे महाराष्ट्रातून फोन आले. अनेक पदाधिकाऱ्यांचे अस्वस्थ होऊन फोन आले. या सगळयांना मी हेच सांगितले की, आता निवडणूक आहे. दिवस खूप कमी आहेत. २१ तारखेला मतदान आहे. त्यासाठी सगळयांनी झटून काम करुया दोन तृतीयांश बहुमताने भाजप महायुतीला विजयी करूया.
मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील हे माझ्यासाठी व प्रकाश मेहता यांच्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांनी खूप मदत केली. पण पक्षाचे एक पार्लमेंट्री बोर्ड असते त्या निर्णयाप्रमाणे पक्ष चालतो. मुळात पक्षात असे कोणी कुणाचे स्पर्धक नाहीत. पक्षाचे हायकमांड यामध्ये निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्ही एक टीम म्हणून काम करते असतो. निवडणूक झाल्यानंतर आवर्जून अमितभाई, संघटक मंत्री संतोष कुमारजी यांची भेट घेईन आणि चर्चा करेन.
मी विधान परिषदेतून विधानसभेत आलो आहे. त्यामुळे, विधानसभेत आल्यानंतर पुन्हा विधान परिषदेत जाऊ ही केवळ माझ्याविषयी प्रेम असलेल्यांनी व्यक्त केलेली भावना असल्याचे सांगात, शेवटी पक्ष जो निर्णय घेईन ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे तावडे म्हणाले.